बोलवाडात काडतूस बॉम्बच्या स्फोटात बालिका ठार
By Admin | Updated: September 25, 2015 00:26 IST2015-09-25T00:11:08+5:302015-09-25T00:26:58+5:30
हा बॉम्ब तिने तोंडात धरून चावल्याने तिच्या तोंडातच तो फुटला. त्यामुळे स्फोट होऊन जबडा छिन्नविच्छिन्न होऊन उमाश्रीचा जागीच मृत्यू झाला.

बोलवाडात काडतूस बॉम्बच्या स्फोटात बालिका ठार
मिरज : बोलवाड (ता. मिरज) येथे जनावरांच्या शिकारीसाठी वापरण्यात येणाऱ्या काडतूस बॉम्बसोबत खेळणाऱ्या उमाश्री राजा शिंदे
(रा. बोलवाड) या आठ वर्षीय बालिकेच्या तोंडात बॉम्बचा स्फोट झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना गुरुवारी सकाळी घडली. उमाश्री अपंग व मतिमंद होती. इंदापूर येथील शिंदे कुटुंबीय मामाकडे बोलवाड येथील आंबेडकर नगरात वास्तव्यास आहेत. गुरुवारी सकाळी उमाश्रीची आई व लहान बहीण झोपडीत बसली असताना उमाश्री जनावरांच्या शिकारीसाठी ठेवलेला काडतूस बॉम्ब घेऊन दरवाजात खेळत होती. हा बॉम्ब तिने तोंडात धरून चावल्याने तिच्या तोंडातच तो फुटला. त्यामुळे स्फोट होऊन जबडा छिन्नविच्छिन्न होऊन उमाश्रीचा जागीच मृत्यू झाला. ग्रामीण भागात डुक्कर व अन्य जनावरांच्या शिकारीसाठी लिंबूच्या आकाराची स्फोटके वापरण्यात येतात. ही स्फोटके घरातच ठेवली जातात. मृत मुलीच्या नातेवाइकांकडून फटाक्यांतील बॉम्ब फुटल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोलिसांच्या चौकशीत जनावरांच्या शिकारीसाठी वापरण्यात येणाऱ्या काडतूस बॉम्बचा स्फोट झाल्याचे निष्पन्न झाले. याबाबत सनातन भोसले यांनी ग्रामीण पोलिसांत वर्दी दिली आहे.