बोगस रेशन कार्ड; आणखी दोघांना अटक
By Admin | Updated: April 18, 2015 00:03 IST2015-04-17T23:47:28+5:302015-04-18T00:03:59+5:30
कुपवाडमधील प्रकार : अडीच हजारात शिधापत्रिका; यंत्रणेला आव्हान

बोगस रेशन कार्ड; आणखी दोघांना अटक
सांगली : अवघ्या अडीच हजारात बोगस रेशन कार्ड देऊन प्रशासकीय विशेषत: जिल्हा पुरवठा विभागाला आव्हान देणाऱ्या टोळीतील आणखी दोघांना अटक करण्यात कुपवाड पोलिसांना गुरुवारी रात्री यश आले. निहाल ईस्माईल अत्तार (वय ३७, रा. गवळी गल्ली) व सूरज ऐनुद्दीन हेरवाडे (२८, शामरावनगर, सांगली) अशी त्यांची नावे आहेत. यापूर्वी रविराज ऊर्फ गुंड्याभाऊ हणमंत जाधव (४०, बुधगाव, ता. मिरज) यास अटक केली आहे. यामध्ये मोठे रॅकेट असून, तपासाची व्याप्ती वाढली असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी सांगितले.
कुपवाड येथील अंकुशनगरमधील रिक्षाचालक सर्जेराव विजय केसरे यांना रेशन कार्ड मिळवून देतो, असे म्हणून संशयित जाधव याने अडीच हजार रुपये घेतले होते. जाधवने रेशन कार्ड आणून दिले. मात्र त्यावर रेशन दुकानदाराचे नाव व शिक्का नव्हता. केसरे यांनी यासंदर्भात त्याच्याकडे विचारणा केली. त्यावेळी त्याने तीन महिन्यांनी रेशन कार्ड नोंद करुन दुकानदाराचा शिक्का मारुन देतो, असे सांगितले. तथापि सहा महिने होऊन गेले तरी त्याने शिक्का मारुन दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच केसरे यांनी कुपवाड पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी जाधवला अटक केली. त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने निहाल अत्तार याच्याकडून रेशन कार्ड बनवून घेतल्याचे सांगितले. निहालला ताब्यात घेण्यात आले. त्याने सूरज हेरवाडे याच्याकडून रेशन कार्ड बनवून घेतल्याची कबुली दिली. यामुळे हेरवाडेलाही अटक करण्यात आली.
संशयित हेरवाडे हा मुख्य सूत्रधार आहे. यापूर्वी बोगस रेशन कार्डच्या गुन्ह्यात त्याला सांगलीत अटक झालेली आहे. जे लोक परराज्यातील आहेत, त्यांना रहिवासी असल्याचा पुरावा सादर करण्यासाठी रेशन कार्डची गरज असते. त्यावेळी संशयित त्यांना गाठून तीन हजारापासून ते पाच हजारापर्यंत रक्कम घेऊन रेशन कार्ड देतात. त्यावर जिल्हा पुरवठा विभागात हुबेहूब शिक्का व अन्नधान्य वितरण अधिकाऱ्याची सही करुन देतात. गेल्या अनेक वर्षापासून टोळीचा हा उद्योग सुरु आहे. आतापर्यंत त्यांनी दीडशेहून अधिक जणांना बोेगस रेशन कार्ड दिले असण्याची शक्यता आहे. सध्या तरी त्यांच्याकडून ११ रेशन कार्डे जप्त करण्यात आली आहेत. संशयितांच्या घराची झडती घेण्यात आली आहे. यामध्ये मोठी टोळी सक्रिय असून, सखोल तपास केला जाईल, असे सहायक पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पुन्हा प्रकरण चव्हाट्यावर
दीड वर्षापूर्वी सांगली शहर पोलिसांनी बोगस रेशन कार्डचे प्रकरण उघडकीस आणले होते. त्यावेळी तीनशेहून बोगस रेशन कार्डे जप्त करण्यात आली होती. या रेशन कार्डावर जिल्हा पुरवठा विभागाचा शिक्का व अन्नधान्य वितरण अधिकाऱ्याची सही होती. भारतीय राजमुद्रा असलेल्या शिक्क्याचाही वापर करण्यात आला होता. याप्रकरणी चौघांच्या टोळीला अटक केली होती. यामध्ये कुपवाड पोलिसांनी अटक केलेल्या सूरज हेरवाडे याचाही समावेश होता. मात्र याचा सखोल तपास झाला नाही. यामुळे संशयित जामिनावर बाहेर आले. त्यांनी पुन्हा बोगस रेशन कार्डचा उद्योग सुरु केल्याचे स्पष्ट झाले आहे.