बोगस १२ डॉक्टरांना शिक्षा
By Admin | Updated: November 16, 2014 23:54 IST2014-11-16T22:52:11+5:302014-11-16T23:54:36+5:30
न्यायालयाचा निकाल : जतच्या एकास २ वर्षे कारावास

बोगस १२ डॉक्टरांना शिक्षा
सांगली : बोगस रुग्णालय थाटून नागरिकांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ करणाऱ्या जिल्ह्यातील १२ बोगस डॉक्टरांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. यामध्ये जतच्या एका डॉक्टरास सर्वाधिक दोन वर्षे कारावासाची शिक्षा लागली आहे. जिल्हा प्रशासनाने बोगस डॉक्टरांविरुद्ध उघडलेल्या मोहिमेत हे संशयित सापडले होते. न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावल्याने वैद्यकीय व्यवसायातील बोगसगिरीला आळा बसेल.
जतमधील शिलवनतुया लागेतूसराव नागभूषण यास दोन वर्षे कारावास व दोन हजार रुपये दंड, दरीबडची (ता. जत) येथील व्हनाप्पा साताप्पा तेरदाळ यास पाचशे रुपये दंड, दंड न भरल्यास सात दिवस कैद, इस्लामपुरातील अमणेशकुमार मुरलीधर मिश्रा यास तीनशे रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद, मिरजेतील सुभाषनगरमधील विवेकानंद शंकरराव कुलकर्णी यास तीन हजार रुपये दंड, बेडग (ता. मिरज) येथील केशव विष्णू खाडे यास तीन हजार दंड, मिरजेतील समतानगरमधील मोहन वसंत नाईक यास तीन हजार रुपये दंड, मिरजेतील बाळकृष्ण शंकर कोळी यास तीन हजार रुपये, तर अशोक लक्ष्मण भोरे याला पाच हजार रुपये दंड, नरवाड (ता. मिरज) येथील राजू गुरुपाद मलवाडे व दादासाहेब गजेंद्र लोहार या दोघांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंड, भोसे (ता. मिरज) येथील प्रकाश बापू चव्हाण यास तीन हजार रुपये दंड व कुपवाडच्या इंदिरानगरमधील विजय बाजीराव थोरात यास एक हजार रुपये दंड व चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र देण्याची शिक्षा सुनावली आहे. (प्रतिनिधी)
भक्कम पुरावा सादर
जिल्हा प्रशासनाने बोगस डॉक्टरांविरुद्ध मोेहीम उघडली होती. या मोहिमेत हे १२ संशयित सापडले होते. त्यांच्याविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी तपास करुन त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होेते.