सफाई कर्मचाऱ्यांना बोगस नियुक्तीपत्रे
By Admin | Updated: August 27, 2014 23:19 IST2014-08-27T22:53:38+5:302014-08-27T23:19:57+5:30
मिरजेत मुकादमाकडून फसवणूक : गंभीर प्रकाराकडे आयुक्तांचे दुर्लक्ष

सफाई कर्मचाऱ्यांना बोगस नियुक्तीपत्रे
मिरज : मिरजेतील मानधनावरील सफाई कर्मचाऱ्यांना बोगस नियुक्तीपत्रे देऊन कामावर घेण्याच्या प्रकाराबाबत तक्रार झाली आहे. मात्र आयुक्त व कामगार अधिकाऱ्यांनी याबाबत मौन पाळल्याने पोलिसांत अद्याप तक्रार दाखल झालेली नाही.
मिरजेत प्रभाग तीन व चारमध्ये सुमारे चारशे सफाई कामगार आहेत. सफाई कर्मचाऱ्यांवर दरमहा लाखो रूपये खर्च होत असताना, या विभागातील अंदाधुंद कारभारावर कोणाचेच नियंत्रण नसल्याची परिस्थिती आहे. कंत्राटी बदली व मानधनावरील कर्मचाऱ्यांची बोगस हजेरी लावून व वाहनांच्या डिझेलचा अवाजवी खर्च दाखवून दररोज हजारो रूपयांचा घोटाळा करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. प्रभाग चारमध्ये सुमारे दहा कर्मचाऱ्यांना मानधनावर सफाई कर्मचारी म्हणून नियुक्तीचे पत्र देण्यात आले. कामगार अधिकाऱ्याची सही असलेल्या या बोगस पत्राद्वारे नियुक्तीसाठी कामगारांकडून प्रत्येकी २५ हजार रूपये एका मुकादमाने घेतल्याची चर्चा आहे. बनावट आदेशाद्वारे नियुक्ती झालेल्यांपैकी काही कर्मचाऱ्यांचा पगार निघाला नसल्याने, हे प्रकरण चव्हाट्यावर आले. मात्र आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आता प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बनावट नियुक्तीपत्रे देणाऱ्या मुकादमाचे निलंबन करून या प्रकरणाच्या चौकशीचा फार्स करण्यात येत आहे. मात्र हजारोेची फसवणूक झालेल्या कामगारांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे.
बोगस नियुक्तीपत्र देऊन मानधनावरील कर्मचारी भरतीचा प्रकार गंभीर असतानाही कामगार अधिकारी व आयुक्तांनी याची दखल घेतलेली नाही. या घटनेबाबत महापालिका प्रशासनाकडून पोलिसांत तक्रार देण्याऐवजी चौकशीचा घोळ घालण्यात येत असल्याची कामगारांची तक्रार आहे. फसवणूक झालेल्या कामगारांनी याबाबत पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे. मात्र महापालिकेडून तक्रार नसल्याने पोलिसांनी याची दखल घेतलेली नाही. या भ्रष्टाचाराला अभय देण्यासाठी आयुक्तांवर दबाव आणून हे प्रकरण गुंडाळण्याच्या हालचाली सुरू असल्याने कामगार संतप्त झाले आहेत. (वार्ताहर)
आर्थिक व्यवहाराची चर्चा
महापालिकेतील आरोग्य विभागातील खाबूगिरीने कळस गाठला आहे. लाचखोरीच्या प्रकरणात सापडलेले आरोग्य अधिकारी पुन्हा पदावर रूजू झाले आहेत. मिरजेत सफाई कर्मचाऱ्यांना मुकादम म्हणून अनधिकृत व तात्पुरती बढती देण्यासाठीही आर्थिक व्यवहार सुरू असल्याची चर्चा आहे. कामगारांना तात्पुरते मुकादमाचे काम देण्यासाठी स्वच्छता निरीक्षकाची चांदी होत आहे. कचऱ्यातून भंगार विक्रीचा उद्योग जोमात सुरू आहे.