शरीरसौष्टवपटू जगदीश लाड यांचे कोरोनामुळे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:26 IST2021-05-01T04:26:15+5:302021-05-01T04:26:15+5:30
पलूस : मिस्टर इंडियाचा किताब जिंकणारे मराठमोळे शरीरसौष्ठवपटू जगदीश लाड (वय ३४, मुळ गाव : कुंडल, ता. पलुस) ...

शरीरसौष्टवपटू जगदीश लाड यांचे कोरोनामुळे निधन
पलूस : मिस्टर इंडियाचा किताब जिंकणारे मराठमोळे शरीरसौष्ठवपटू जगदीश लाड (वय ३४, मुळ गाव : कुंडल, ता. पलुस) यांचे शुक्रवारी कोरोनामुळे बडोदा (गुजरात) येथे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर शरीरसौष्ठव विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे.
जगदीश यांनी आपली कारकीर्द अगदी कमी वयात गाजविली होती. जगदीश यांनी ‘नवी मुंबई महापौर श्री’चा किताब जिंकला होता. महाराष्ट्र श्री स्पर्धेत सुमारे चार वेळा सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. त्याचबरोबर मिस्टर इंडियामध्ये दोन वेळा सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. मुंबईत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जगदीश यांनी कास्य पदकावर आपली मोहोर उमटविली होती. राज्यातील अनेक शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये जगदीश यांनी भाग घेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज राज्यातील अनेक प्रसिद्ध शरीरसौष्ठवपटूंमध्ये जगदीश यांचे नाव घेतले जाते.
दरम्यान, शरीरसौष्ठव क्षेत्रात आपले वलय निर्माण करीत त्यांनी बडोद्याला व्यवसाय सुरू केला होता. त्य़ांनी स्वत:ची व्यायामशाळा सुरू केली होती. या व्यायामशाळेच्या कामानिमित्त जगदीश थोडे दिवस बडोद्याला स्थायिक झाले होते. तेथेच त्यांना कोरोनाची लागण झाली व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.