मगरीने ओढून नेलेला मेंढपाळाचा मृतदेह सापडला
By Admin | Updated: October 15, 2016 20:24 IST2016-10-15T20:24:25+5:302016-10-15T20:24:25+5:30
मेंढपाळ संजय गंगाराम भानुसे (वय ४५) यांच्यावर शुक्रवारी कृष्णा नदीकाठी मगरीने हल्ला करून त्यांना नदीत ओढून नेले.

मगरीने ओढून नेलेला मेंढपाळाचा मृतदेह सापडला
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
कसबे डिग्रज, दि. १५ - मिरज तालुक्यातील तुंग येथील मेंढपाळ संजय गंगाराम भानुसे (वय ४५) यांच्यावर शुक्रवारी कृष्णा नदीकाठी मगरीने हल्ला करून त्यांना नदीत ओढून नेले. शनिवारी सकाळी कसबे डिग्रज जॅकवेल परिसरात कृष्णा नदीत त्यांचा मृतदेह सापडला. यावेळी घटनास्थळी कुटुंबियांनी आक्रोश केला. वनविभागाने तातडीची मदत म्हणून २५ हजारांची मदत जाहीर केली.
शुक्रवारी दुपारी संजय भानुसे, सचिन हराळे मेंढ्या घेऊन कृष्णा नदी परिसरात गेले होते. त्यावेळी संजय भानुसे यांच्यावर १२ फुटी मगरीने हल्ला केला. त्यावेळी लोकांनी आरडाओरड केली, पण मगरीने संजय यांना नदीपात्रात ओढत नेले. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तुंग, कसबे डिग्रजचे तरुण दोन होडीतून शोध घेत होते.
पण रात्री उशिरापर्यंत काही सापडले नाही. पुन्हा शनिवारी सकाळीही शोधमोहीम सुरू केली. त्यावेळी कसबे डिग्रज जॅकवेल परिसरात संजय यांचा मृतदेह सापडला. उजवा हात, कंबर, पाय अशा विविध ठिकाणी मगरीचे नऊवेळा दात लागल्याचे दिसले.
हातावरही मोठ्या जखमा होत्या.
गतवर्षी जून महिन्यात झालेल्या मगर गणनेत भिलवडी डोह ते सांगली पूल परिसरात १९ मोठ्या आणि ३९ लहान मगरी आढळल्या आहेत. आतापर्यंत आठ बळी गेले आहेत, तर ४० जण मगर हल्ल्यात जखमी झाले आहेत. कृष्णा नदीकाठाला मगरसंरक्षक जाळी बसविण्याची मागणी सरपंच विशाल चौगुले, संतोष पिंपळे यांनी वनअधिकारी संजय चव्हाण, ए. बी. निंबाळकर, डी. ए. भोसे यांच्याकडे केली.