सांगली : जत पंचायत समितीच्या छोटे पाटबंधारे विभागातील शाखा अभियंता अवधूत अशोक वडार (वय २७, मूळ रा. इस्लामपूर) यांचा मृतदेह कृष्णा नदीत बायपास रस्ता पुलाखाली शनिवारी सकाळी आढळल्याने तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.दरम्यान, जतमधील स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच पंचायत समितीमधील अधिकारी, कर्मचारी यांच्या त्रासाला कंटाळून अवधूत यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. गुन्हे दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. सायंकाळी उशिरा मृतदेह ताब्यात घेतला.मूळचे इस्लामपूर येथील अवधूत वडार गेल्या सहा-सात वर्षांपासून जत पंचायत समितीमध्ये शाखा अभियंता म्हणून कार्यरत होते. नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार सहा महिन्यांपासून ते सतत कामाच्या तणावात होते. त्यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव असल्याने ते घरी सांगत होते. या तणावातून ते शुक्रवारी जत येथून निघाले होते. व्हॉटस्ॲपच्या ग्रुपमधूनही ते बाहेर पडले होते. सायंकाळी उशिरा घराकडे न परतल्यामुळे नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. त्यांचा मोबाइलही लागत नव्हता.शनिवारी सकाळी बायपास रस्त्यावरील पुलाखाली मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी स्पेशल रेस्क्यू फोर्सला पाचारण केले. पथकातील कैलास वडार, सागर जाधव, सदाशिव पेडेकर, महेश गव्हाणे, अनिल बसरगट्टी, सदाशिव भोसले व सौरभ पुकळे यांनी पुलाखाली नदीपात्रात उतरून मृतदेह बाहेर काढला.पोलिसांच्या चौकशीत मृतदेह जत येथे कार्यरत अवधूत वडार यांचा असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे वडार यांच्या इस्लामपूर व जत येथील नातेवाइकांशी संपर्क साधून माहिती कळवली. पंचनामा करून मृतदेह सिव्हिलमध्ये विच्छेदनासाठी पाठवला. प्राथमिक तपासात वडार यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.अवधूत वडार यांचा मृतदेह नदीत आढळल्याचे समजताच इस्लामपूर येथील नातेवाइकांनी सिव्हिलकडे धाव घेतली. कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत अवधूत यांच्या मृत्यूने नातेवाइकांना धक्का बसला.दरम्यान, अवधूत वडार यांच्या मृत्यूप्रकरणी चुलते, चुलतभाऊ यांनी माध्यमांशी बोलताना काही आरोप केले. जत पंचायत समितीमधील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांचा अवधूत यांच्यावर दबाव होता. एका लोकप्रतिनिधीचा स्वीय सहायक तसेच काही राजकीय मंडळींच्या त्रासामुळे, दबावामुळे अवधूत यांनी आत्महत्या केल्याचा आरोप व्यक्त केला.अवधूत यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या लोकांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे सिव्हिलमध्ये तणाव निर्माण झाला होता. अखेर समजूत काढल्यानंतर मृतदेह घेऊन ते सायंकाळी उशिरा इस्लामपूरकडे रवाना झाले.
पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंदशाखा अभियंता अवधूत वडार यांचा कृष्णा नदीत मृतदेह मिळाल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची प्राथमिक नोंद झाली आहे.
तालुक्यासह जिल्ह्यात खळबळअवधूत वडार यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर नातेवाइकांनी पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्रास दिल्याचा आरोप केला आहे. त्यामुळेच अवधूत यांनी आत्महत्या केल्याचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.