मृतदेह नेलेली ‘ती’ मोटार जप्त
By Admin | Updated: July 26, 2015 00:17 IST2015-07-26T00:08:00+5:302015-07-26T00:17:00+5:30
कवलापूर खून प्रकरण : चौकशीसाठी आणखी दोघे ताब्यात; कसून चौकशी

मृतदेह नेलेली ‘ती’ मोटार जप्त
सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथील करण अनिल खेडकर या तरुणाचा खून करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अटकेत असलेल्या अरुण माळी याने वापरलेली मोटार संजयनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री जप्त केली आहे. दरम्यान, याप्रकरणी चौकशीसाठी आणखी दोघांना शनिवारी दुपारी ताब्यात घेतले आहे.
करणच्या नात्यातील एका महिलेशी संशयित अरुण माळी याचे अनैतिक संबंध होते. करणला याची कुणकुण लागली होती. त्याने अरुणला ‘तू आमच्या नात्यातील महिलेच्या घरी का येतोस? तिच्याशी मोबाईलवर का बोलतोस? अशी विचारणा केली. यातून त्यांच्यात जोरदार वादावादी झाली होती.
करण अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याचे लक्षात येताच अरुणने त्याचा कायमचा काटा काढण्याचा बेत आखला होता. त्यानुसार त्याने २१ जुलैरोजी कवलापुरातील महादेव तालमीत करणला बोलावून डोक्यात लाकडी बांबूने प्रहार करून व दोरीने गळा आवळून खून केला होता. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने गावातील किराणा मालाचे व्यापारी विशाल जाधव-सलगरे यांच्या मोटारीचा वापर केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार शुक्रवारी रात्री जाधव यांची मोटार (क्र. एमएच १० एएन १३५०) जप्त केली आहे. याप्रकरणी जाधव यांची चौकशी केली जात आहे. अरुण माळी याने जाधव यांच्याकडू आष्टा (ता. वाळवा) घरातील भाडे घेऊन जात असल्याचे सांगून मोटार नेली होती. मोटार देताना जाधव यांनी जाताना व येताना किती किलोमीटर मोटार धावली, याची नोंद करुन ठेवली आहे. मोटार त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरल्याचे स्पष्ट झाले आहे. शिराळा-बायपास रस्त्यावरील मोरणा पुलाखाली मृतदेह त्याने फेकून दिला होता.
करण शांतिनिकेतमधील कला शाखेत अकरावीत शिक्षण घेत होता. घटनेदिवशी तो दुपारी साडेबारा वाजता महाविद्यालयातून बेपत्ता झाला होता. रात्री नऊपूर्वी त्याचा खून झाला असावा, असे पोलिसांनी सांगितले. शनिवारी दुपारी चौकशीसाठी दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्यांचा यामध्ये सहभाग आहे का नाही? याची चौकशी केली जात आहे. मृतदेह सापडलेल्या मोरणा पुलाखाली पोलीस पुन्हा पाहणी करण्यासाठी जाणार असल्याचे सांगण्यात आले. अरुण येत्या सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत आहे. (प्रतिनिधी)