शासकीय रुग्णालयात झाली मृतदेहाची अदलाबदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:24 IST2021-03-07T04:24:05+5:302021-03-07T04:24:05+5:30

सांगली : शहरातील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात शुक्रवारी रात्री नातेवाईकांना मृतदेह देताना दुसराच मृतदेह देण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडला. ...

The bodies were exchanged at a government hospital | शासकीय रुग्णालयात झाली मृतदेहाची अदलाबदल

शासकीय रुग्णालयात झाली मृतदेहाची अदलाबदल

सांगली : शहरातील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात शुक्रवारी रात्री नातेवाईकांना मृतदेह देताना दुसराच मृतदेह देण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडला. कर्नाटकातील नातेवाईकांना मृत महिलेऐवजी पुरुषाचा मृतदेह देण्यात आला होता. नातेवाईकांनीही तो ताब्यात घेतला मात्र, काही वेळानंतर प्रवासात हा प्रकार लक्षात आल्यानंतर नातेवाईक पुन्हा मृतदेह घेऊन रुग्णालयात आल्यानंतर हा प्रकार समोर आला. मृतदेह बदलाच्या या घटनेची गंभीर दखल घेत चौकशीसाठी समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.

कर्नाटकातील एका महिलेवर शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. शुक्रवारी रात्री त्यांचा मृत्यू झाल्यानंतर याबाबत तेथील कर्मचाऱ्यांनी नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह गावाकडे नेण्याची तयारी केली.

याच कालावधीत एका पुरुष रुग्णाचाही मृत्यू झाला होता. दोन्ही मृतदेह जवळ ठेवून पूर्णपणे झाकले होते. डॉक्‍टरांनी यावेळी महिलेऐवजी पुरुषाचा मृतदेह त्या नातेवाईकांना दिला. त्यांनीही तिथे पाहणी न करता, रुग्णवाहिकेतून मृतदेह घेऊन निघून गेले.

काही वेळानंतर रुग्णालय प्रशासनाच्या ही बाब आल्यानंतर त्यांनी नातेवाईकांना फोन करून खातरजमा केली, तर महिलेऐवजी पुरुषाचा मृतदेह देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्या नातेवाईकांनी पुन्हा सांगलीकडे येत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह देण्याअगोदर खातरजमा करून न घेता बेजबाबदारपणे मृतदेह ताब्यात देण्यात आल्याने दोन्ही बाजूच्या नातेवाईकांना मन:स्ताप सहन करावा लागला. शासकीय रुग्णालयात असे प्रकार घडत असल्याने दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

चौकट

चौकशी होणार

शासकीय रुग्णालयातील भोंगळ कारभाराची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. हा प्रकार अत्यंत चुकीचा असून, चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदकुमार गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: The bodies were exchanged at a government hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.