जांभुळणी दुर्घटनेतील तिघा भावंडांचे मृतदेह सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST2021-06-09T04:34:49+5:302021-06-09T04:34:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खरसुंडी : आटपाडी तालुक्यातील जांभुळणी-घाणंददरम्यानच्या बंधाऱ्यात रविवारी वाहून गेलेल्या विजय अंकुश होनमाने, आनंद लव्हाजी होनमाने आणि ...

जांभुळणी दुर्घटनेतील तिघा भावंडांचे मृतदेह सापडले
लोकमत न्यूज नेटवर्क
खरसुंडी :
आटपाडी तालुक्यातील जांभुळणी-घाणंददरम्यानच्या बंधाऱ्यात रविवारी वाहून गेलेल्या विजय अंकुश होनमाने, आनंद लव्हाजी होनमाने आणि वैभव लव्हाजी होनमाने या तिघा भावंडांचे मृतदेह सोमवारी सापडले.
सोमवारी सकाळी आठ वाजता एकाचा आणि साडेदहा वाजता दुसऱ्या दोघांचा मृतदेह सापडला. मुलांचे मृतदेह पाहून आई-वडिलांसह नातेवाइकांनी हंबरडा फोडला. परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
जांभुळणी-घाणंदच्या बंधाऱ्यात रविवारी सायंकाळी वाहून गेलेल्या या तिघा भावंडांना शोधण्यासाठी तहसीलदार व पोलीस प्रशासनाने सांगली, भिलवडी येथील आपत्कालीन पथकांना पाचारण केले होते. आयुष सेवाभावी संस्थेच्या आणि विश्व फाउंडेशनच्या आपत्कालीन पथकाने गावकऱ्यांच्या मदतीने रविवारी रात्रीपासून शोधमोहीम सुरू केली होती. रात्री पाण्याचा वेग जास्त असल्याने शिवाय अंधार व चिलार झुडपांमुळे शोधकार्यात अडथळे येत होते. सकाळी साडेदहापर्यंत तिघा भावंडांचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यास आपत्कालीन पथकाला यश आले. पंचनामा करून मृतदेह आटपाडी येथे पाठवण्यात आले.
आ. गोपीचंद पडळकर, प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार सचिन मुळीक, आटपाडीचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे, माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, घाणंदचे सरपंच नितीन होनमाने, जांभुळणीच्या सरपंच संगीता मासाळ, नांदणी पाटील, महादेव जुगदर, शिवराम मासाळ, तरुण मंडळे मदतीसाठी उपस्थित होती. दुपारी दोन वाजता आटपाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांना देण्यात आले. दुपारी अडीच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आ. अनिल बाबर, तानाजी पाटील उपस्थित होते.