रक्तपेढ्यांत रक्ताची टंचाई
By Admin | Updated: October 26, 2014 23:27 IST2014-10-26T22:21:25+5:302014-10-26T23:27:29+5:30
रक्तदानाचे आवाहन : सुट्ट्यांमुळे संकलनात झाली घट

रक्तपेढ्यांत रक्ताची टंचाई
मिरज : रक्तदान शिबिरांच्या घटत्या संख्येमुळे मिरजेतील रक्तपेढ्यांत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णास रक्त पुरवठ्यासाठी रक्तपेढ्यांची व रुग्णांच्या नातेवाईकांची रक्तासाठी धावपळ होत आहे. दिवाळी सुट्टीच्या हंगामात वाढणारी रुग्णांची संख्या लक्षात घेता, रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन रक्तपेढ्या व सामाजिक संस्थांनी केले आहे.
मिरजेत रुग्णालयांची संख्या मोठी आहे. शासकीय रुग्णालये, वॉन्लेस हॉस्पिटलसह शहरातील इतर खासगी रुग्णालयात अपघातातील जखमी, कर्करोगाचे रुग्ण व प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण मोठे आहे. हिमोफेलिया व थॅलेसिमिया अशा विविध आजारांवर आधुनिक शस्त्रक्रिया उपचारांची सुविधा उपलब्ध असल्याने मोठ्यासंख्येने रुग्ण उपचारासाठी मिरजेला येतात. येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना रक्ताचा पुरवठा करण्यासाठी वसंतदादा पाटील रक्तपेढी, वॉन्लेस हॉस्पिटल, सिध्दिविनायक कर्करोग रुग्णालय, मिरज सिरॉलॉजिकल इन्स्टीट्यूट यासह रक्तपेढ्या आहोरात्र सुरू असतात.
सर्व रक्तपेढ्यांतून दररोज सुमारे २५० ते ३०० बाटल्या रक्ताची मागणी आहे. रक्त बिंदिका, पेशी यांचाही यात समावेश आहे. रक्तातून रक्तबिंदिका व पेशी वेगळ्या करण्याची सुविधा केवळ मिरजेतील रक्तपेढ्यातच उपलब्ध असल्याने शेजारील जिल्ह्यातून व कर्नाटकातील रुग्णालयांकडूनही वेळोवेळी रक्ताची मागणी होते. ऐच्छिक रकतदाते, विविध ठिकाणी होणारी रक्तदान शिबिरे व रक्तासाठी बदली रक्त देणाऱ्या दात्यांवर या रक्तपेढ्या अवलंबून आहेत. रक्ताची मागणी मोठी असताना सध्या रक्तपेढ्यांत रक्ताचा साठा मात्र मर्यादित आहे. बहुतेक सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रुग्णांच्या मागणीपेक्षा कमी केवळ २५ ते ३० बाटल्या एवढाच रक्तसाठा उपलब्ध होत आहे.
मिरजेतील पेढ्यांची
रक्तासाठी कसरत
अपघातातील जखमी व अत्यवस्थ रुग्णांना प्राधान्याने रक्तपुरवठा केला जात आहे. इतर आजारांच्या रुग्णांना मात्र रक्तासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. रक्तपेढ्यात ए, बी, एबी, ओ निगेटीव्ह अशा सर्वच रक्तगटांचा तुटवडा असल्याने मागणी आल्यास रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी त्या-त्या रक्तगटाच्या दात्यांशी संपर्क करुन रक्तपुरवठा करण्याचा प्रयत्न रक्तपेढी चालक करीत आहेत.
गेली दोन महिने विधानसभा निवडणुकीमुळे रक्तदान शिबिरांमध्ये झालेली घट, महाविद्यालयांच्या सुट्टया, शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची वाढलेली संख्या यासह अनेक कारणांमुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.