इस्लामपुरात शेतकरी संघटनांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:24 IST2021-02-07T04:24:52+5:302021-02-07T04:24:52+5:30
इस्लामपूर : दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आणि शेतकरीविरोधी कायदे रद्द व्हावेत यासाठी इस्लामपूर-पेठ रस्त्यावरील चव्हाण ...

इस्लामपुरात शेतकरी संघटनांचा रास्ता रोको
इस्लामपूर : दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आणि शेतकरीविरोधी कायदे रद्द व्हावेत यासाठी इस्लामपूर-पेठ रस्त्यावरील चव्हाण कॉर्नरजवळ रस्ता रोको करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटना, रघुनाथदादाप्रणीत शेतकरी संघटना, विद्रोही संघटना आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या.
रास्ता रोको आंदोलनाने काहीकाळ वाहतूक ठप्प झाल्याने पेठ-सांगली रस्त्यावर पेठनाका ते प्रकाश हॉस्पिटलपर्यंत दोन्ही बाजूनी वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. तसेच वाघवाडी फाट्यावरून आत येणाऱ्या रस्त्यावर वाहने थांबून होती. आंदोलन थांबविण्यावरून पोलीस आणि आंदोलाकात किरकोळ वाद झाला.
शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील म्हणाले, दिल्लीतील आंदोलनाकडे बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. सरकार गंभीर नाही मात्र जनतेने गंभीर व्हायला हवे. शेतकरीविरोधी कायदे रद्द झाले नाहीत तर त्याची आपणा सर्वांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे. स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव म्हणाले, गेली ७४ दिवस शेतकरी दिल्लीच्या सीमेवर बसले असताना भाजप सरकारला शेतकऱ्यांचे देणे घेणे नाही. केंद्राच्या कृषी कायद्याने शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. त्यामुळे हे कायदे रद्द करावेत. अन्यथा आदोलन तीव्र करण्यात येईल.
‘प्रहार’चे दिग्विजय पाटील, आप्पासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. हणमंत पाटील, राज्य प्रवक्ते ॲड. एस. यू. संदे, प्रकाश देसाई, राम पाटील, जगन्नाथ भोसले, तानाजी साठे, सतोष शेळके, देवेंद्र धस, खाशेराव निंबाळकर उपस्थित होते.
फोटो-०६इस्लामपूर१