शतज्वालांनी जळणारी एक धगधगती मशाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:19 IST2021-07-15T04:19:27+5:302021-07-15T04:19:27+5:30
ज्यांच्या जीवन प्रवासाला पावलागणिक आलेल्या जीवघेण्या प्रसंगांना, नि:स्वार्थी देशभक्तीच्या कार्याला, समाजोपयोगी अनेक चळवळींच्या अफाट कार्याला, मर्यादित शब्दांनी बांधणे कठीण ...

शतज्वालांनी जळणारी एक धगधगती मशाल
ज्यांच्या जीवन प्रवासाला पावलागणिक आलेल्या जीवघेण्या प्रसंगांना, नि:स्वार्थी देशभक्तीच्या कार्याला, समाजोपयोगी अनेक चळवळींच्या अफाट कार्याला, मर्यादित शब्दांनी बांधणे कठीण आहे, असे थोर क्रांतिवीर परमपूज्य नागनाथअण्णा यांची आज ९९ वी जयंती. त्यानिमित्ताने...
साधेपणा, निर्मळ नीतीमत्ता, पल्लेदार दूरदष्टी, जबरदस्त आत्मविश्वास, मानवतावादी विचार, धाडसी सावधपण, भ्रष्टाचार व अंधश्रध्दा यविषयीची चीड, भाेगवादीपणाचा तिरस्कार, भेदक तीक्ष्ण नजर, तत्वनिष्ठा ही क्रांतिवीर आण्णांना निसर्गाकडून मिळालेली मोठी देणगी होती. अण्णांचा जन्म १५ जुलै १९२२चा. त्यांना ८९ वर्षे ८ महिने ७ दिवस इतके दीर्घ आयुष्य लाभले. वयाच्या १८ वर्षापर्यंत अण्णा त्यांच्या स्वत:च्या घरचे सदस्य होते. त्यानंतर जवळजवळ ७० वर्षे ते घराच्या बाहेरच राहिले. १९४२ ते १५ ऑगस्ट १९४७पर्यंत ५ वर्षे अण्णा देशाच्या स्वातंत्र्यासाठी अथकपणे लढले. या काळात त्यांनी प्रतिसरकारच्या माध्यमातून ब्रिटीश, भांडवलदार, सावकार, गावगुंड व घरभेदी यांना हतबल केले, दुष्ट शक्तींचा पुरता बिमोड केला. मोठ्या हिमतीने व धाडसाने त्यांनी गोव्यावरुन हत्यारे आणली, कागल तालुक्यातील कसबा सांगाव पोलीस ठाण्यामधून पोलिसांच्या बंदुका पळवल्या, पे ट्रेन लुटली आणि साडेपाच लाख रुपयांचा धुळे खजिना लुटला. सातार जेलच्या अठरा फूट उंचीच्या तटावरुन उडी मारुन पलायन केले. डीएसपी गिलबर्ट याच्या ऐतवडे येथील छाप्यावेळी घराच्या परसबागेच्या पाच फूट उंचीच्या भिंतीवरुन उडी मारुन वाऱ्याच्या वेगाने ते निसटले.
पंजाबहून आझाद हिंद सेनेतील नानकसिंग व मन्सासिंग या दोन सैनिकांना महाराष्ट्रात आणले. हुतात्मा किसन अहिर व हुतात्मा नानकसिंग यांची जिवंत स्मारके उभी करण्याचा त्यांनी संकल्प सोडला. अशा या जीवघेण्या संघर्षात अण्णांच्या अनेक निष्ठावान सैनिकांनी व कार्यकर्त्यांनी आपला जीव तळहातावर ठेवून त्यांना साथ दिली आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी भक्कम कवचही निर्माण केले.
देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळात ११ ऑगस्ट १९४७पासून जवळजवळ ६५ वर्षे अण्णा समाजसेवेत गुंतून राहिले होते. धरणग्रस्त, पूरग्रस्त, दुष्काळग्रस्त, भूकंपग्रस्त, शेतकरी, कामगार आणि दीनदलित यांच्या सुखासाठी, भाकरीसाठी, पाण्यासाठी आणि निवाऱ्यासाठी अण्णांनी खूप मेहनत घेतली. त्यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या, आंदोलने केली, मोर्चे काढले. यासाठी त्यांना प्रचंड अशी जनशक्ती मिळाली. आईसाहेब आणि कुसुमताई (माई) यांची मोलाची साथही लाभली. दि. २२ मार्च २०१२ रोजी अण्णांची प्राणज्योत मालवली आणि शतपावलांनी जळणारी एक धगधगती मशाल कायमची विझली. त्यांचे स्मारकस्थळ उभ्या महाराष्ट्रातील जनतेसाठी कायम, पिढ्यानपिढ्या प्रेरणास्राेत राहणार आहे, यात तीळमात्र शंका नाही.
- प्रा. आनंदराव शिंदे (वाळवा)