कवठेएकंदमध्ये स्फोट; नऊ ठार

By Admin | Updated: May 5, 2015 00:49 IST2015-05-05T00:41:33+5:302015-05-05T00:49:52+5:30

चौघे गंभीर : फटाक्यांचा कारखाना जमीनदोस्त; १५ किलोमीटरचा परिसर हादरला

Blast Nine killed | कवठेएकंदमध्ये स्फोट; नऊ ठार

कवठेएकंदमध्ये स्फोट; नऊ ठार

सांगली : कवठेएकंद (ता. तासगाव) येथील ‘ईगल फायर वर्क्स’ या फटाके निर्मितीच्या कारखान्यात शोभेच्या दारूचा ‘आऊट’ तयार करताना झालेल्या भीषण स्फोटात नऊजण जागीच ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली.
कारखाना जमीनदोस्त झाला असून बांधकामातील वीट व सिमेंटचे अवशेष विखरून शंभर ते दीडशे फुटांवर जाऊन पडले. स्फोटामुळे १५ किलोमीटरचा परिसर हादरला.जखमीची प्रकृतीही
चिंताजनक आहे.
मृतांमध्ये सुनंदा रामचंद्र गिरी (वय ४५, रा. तुळजापूर-बुद्रुक, जि. सोलापूर), अनिकेत रामचंद्र गुरव (१६), इंदुबाई तुकाराम गुरव (७०), जुबेदा अकबर नदाफ (५५, तिघे रा. कवठेएकंद), शरद शिवाजी गुरव (३८) आणि रामचंद्र गिरी (४८) यांचा जागीच, तर राजेंद्र रामचंद्र गिरी (२२), तानाजी ईश्वर शिरतोडे (३२, दोघेही, रा. कवठेएकंद), अजित निशिकांत तोडकर (३२, वारणानगर, जि. कोल्हापूर), यांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. जखमी झालेले शिवाजी तुकाराम गुरव (४६) यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मृतांना १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून, तर जखमींना एका टेम्पोतून रुग्णालयात आणण्यात आले. स्फोटाची घटना घडल्याची माहिती मिळाल्याने रुग्णालयातील आकस्मिक दुर्घटना विभागातील कक्ष सज्ज ठेवला होता. यातील कारखान्याचे मालक शिवाजी गुरव यांची आई इंदुबाई व मुलगा शरदचाही मृत्यू झाला आहे. शिरतोडे व जुबेदा नदाफ या कामाला होत्या. सुनंदा गिरी याही पती व मुलासह कामास होत्या. शिवाजी गुरव यांचे बंधू रामचंद्र हे दोघे कारखाना चालवित होते.
कवठेएकंदपासून तीन किलोमीटर अंतरावर शिवाजी गुरव यांचा ईगल फायर वर्क्स हा फटाके निर्मितीचा कारखाना आहे. रस्त्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर शेतात हा कारखाना आहे. या ठिकाणी त्यांनी चार शेड उभी केली आहेत. प्रत्येक शेडच्या बांधकामात तीस ते चाळीस फुटाचे अंतर आहे. याठिकाणी ते तयार व कच्चा माल ठेवतात. एका शेडमध्ये ते फटाके तयार करण्याचे काम करतात. त्यांच्याकडे पाच कामगार आहेत. सोमवारी नेहमीप्रमाणे फटाके तयार करण्याचे काम सुरू होते. शोभेच्या दारूचा आऊट तयार करताना अचानक भीषण स्फोट झाला. कारखान्यास आग लागून तो जमीनदोस्त झाला. शेजारीच एक केळीची बाग आहे. या बागेत एक मृतदेह उडून पडला. दोन मृतदेहांचे हात व पाय तुटून पडले होते. आग विझविण्यासाठी तासगाव नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या. दोन तासानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.




 

Web Title: Blast Nine killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.