इनाम धामणीत केमिकलचा स्फोट
By Admin | Updated: October 24, 2015 00:20 IST2015-10-24T00:18:01+5:302015-10-24T00:20:19+5:30
अनेकजण बेशुद्ध : पोलिसासह सहाजण जखमी; कुटुंबास सुरक्षित बाहेर काढले

इनाम धामणीत केमिकलचा स्फोट
सांगली : इनाम धामणी (ता. मिरज) येथील राजेंद्र वाघमारे यांच्या लॅमिनेटेड दरवाजा तयार करण्याच्या कारखान्यात केमिकलचा भीषण स्फोट झाला. यामध्ये एका पोलीस हवालदारासह सहाजण जखमी झाले, तर अनेकजण बेशुद्ध पडले. वाघमारे यांचे कुटुंब या स्फोटात अडकले होते; पण त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. शुक्रवारी सायंकाळी सात वाजता ही घटना घडली.जखमींमध्ये पोलीस हवालदार शिवाजी भीमराव पवार (वय ५४, रा. विश्रामबाग), सुनील विलास पाटील (२२) व महावीर कुमगोंडा पाटील (४९, दोघे रा. इनाम धामणी) यांचा समावेश आहे. पवार यांच्यावर सांगलीच्या शासकीय, तर पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्वांना चेहऱ्यावर व हाताला भाजले आहे. अन्य तिघे किरकोळ जखमी असून, त्यांच्यावर गावात उपचार करण्यात आले. स्फोटातील आगीच्या ज्वाला २० ते २५ फूट येत होत्या. तसेच दुर्गंधीही मोठ्या प्रमाणात पसरली होती. दुर्गंधीमुळे अनेकजण बेशुद्ध पडले आहेत. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.
राजेंद्र वाघमारे यांचे दुमजली घर आहे. पहिल्या मजल्यावर त्यांचा लॅमिनेशनचे दरवाजे तयार करण्याचा कारखाना आहे, तर दुसऱ्या मजल्यावर ते कुटुंबासह राहतात. दरवाजा तयार करण्यासाठी केमिकलचा वापर केला जातो. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता सुटी झाल्याने कामगार कारखाना बंद करून घरी गेले होते. दरम्यान, सात वाजता कारखान्यातून स्फोटासारखे आवाज येऊ लागले. त्यामुळे परिसरातील लोकांनी गर्दी केली. कारखान्यापासून २० ते २५ फूट अंतरावर थांबलेल्या लोकांवर स्फोटाच्या आगीच्या ज्वाला आल्या. त्यामुळे सहाजण जखमी झाले. हवालदार पवार गर्दी हटविण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांच्या चेहऱ्यावर व हातावर आगीच्या ज्वाला आल्या. आगीची तीव्रता वाढू लागल्यानंतर लोक तेथून पळून गेले. परिसरातील लोक आतून दरवाजा बंद करून घरात बसले होते. राजेंद्र वाघमारे यांच्या कुटुंबातील लोक दुसऱ्या मजल्यावर अडकून पडले होते. त्यांना बाहेर काढणे मुश्कील बनले होते. वाघमारेंच्या घराशेजारी बांधकाम सुरू आहे. या बांधकामावरून वाघमारे यांच्या घरावर शिडी लावून त्याआधारे कुटुंबातील लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. (प्रतिनिधी)
‘रेजिन’चा स्फोट : गायकवाड
\पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड म्हणाले की, राजेंद्र वाघमारे यांचा हिंदविजय कॉलनीत लॅमिनेशनचा दरवाजा तयार करण्याचा कारखाना आहे. दरवाजा तयार करण्यासाठी कोबाल्ट व हार्डनर हे रसायन वापरले जाते. त्यास रेजिन असे म्हटले जाते. हा पदार्थ ज्वलनशील आहे. सहा जखमींमधील अग्निशमन दलाचे कर्मचारी मुकुंद कृष्णा घोरपडे व ग्रामस्थ सुनील विलास परीट, प्रमोद भूगोंडा पाटील किरकोळ जखमी झाले आहेत. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या सात गाड्या लागल्या. यामध्ये नुकसान किती झाले आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
केमिकलचा साठा
जखमींच्या नातेवाइकांनी सांगितले की, वाघमारे यांच्या कारखान्यात मोठ्या प्रमाणात केमिकलचा साठा होता. भरवस्तीत ते केमिकलचा साठा करून व्यवसाय करीत आहेत. हे केमिकल ३० ते ३५ लिटरच्या प्लास्टिकच्या कॅनमध्ये भरलेले असते. स्फोटावेळी याठिकाणी ५० ते ६० कॅन असावेत.