पक्षात घेऊन वापरून घेणे ही भाजपची प्रवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:31 IST2021-08-28T04:31:15+5:302021-08-28T04:31:15+5:30

सांगली : प्रत्येकाला पक्षात घेऊन वापरायचे, हे भाजपचे धोरण आहे. तिकडे गेलेल्यांना पश्चात्ताप होईल, हे मी विधानसभेवेळीही सांगितले होते. ...

BJP's tendency is to take advantage of the party | पक्षात घेऊन वापरून घेणे ही भाजपची प्रवृत्ती

पक्षात घेऊन वापरून घेणे ही भाजपची प्रवृत्ती

सांगली : प्रत्येकाला पक्षात घेऊन वापरायचे, हे भाजपचे धोरण आहे. तिकडे गेलेल्यांना पश्चात्ताप होईल, हे मी विधानसभेवेळीही सांगितले होते. बाहेरून आलेले बाहेरच बसतात. कोअर कमिटीत त्यांना प्रवेश नसतो. भाजपमधील राज्यभरातील अनेक नेते मला येऊन सांगतात, भाजपमध्ये काही खरे नाही. मराठवाड्यातील अनेक नेत्यांच्या पक्षप्रवेशासाठीही पुन्हा राज्याचा दौरा सुरू करणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले.

आष्टा येथील भाजपचे नेते वैभव शिंदे यांनी शुक्रवारी येथे राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की, वैभव शिंदे भाजपमध्ये गेले याचे शल्य होते. तशी वेळ यायला नको होती, असे आजही वाटते. भाजपमध्ये त्यांना चांगली संधी द्या, असे मी माझे मित्र देवेंद्र फडणवीस यांना तीनवेळा सांगितले होते. विलासराव शिंदे यांनी माझ्या सर्व निवडणुकांचे सारथ्य केले होते. त्यांनी कधीही मला रागाची जाणीव होऊ दिली नाही. वाळव्याच्या इतिहासात एकत्र येऊन नेहमी प्रगतीची वाटचाल केली.

पाटील म्हणाले की, चुकांतून दुरुस्ती करून मी व वैभव एकत्र आलो आहोत. पुढील पिढी एकत्र येण्यासाठी हे आवश्यक होते. आष्ट्याच्या प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव करण्यास सांगितले आहे. एसटी डेपोसाठीही प्रयत्न करू. तालुकानिर्मितीचा सकारात्मक विचार करू. आष्टा व इस्लामपूर नगरपालिकांना आणखी निधी देणार आहोत.

वैभव शिंदे म्हणाले की, भाजप सोडताना एकाही भाजप नेत्याने मला का जाताय, म्हणून विचारले नाही. मी वैयक्तिक स्वार्थासाठी भाजपमध्ये प्रवेश केला नव्हता. एमआयडीसी, एसटी डेपो व आष्टा तालुका या तीन मागण्यांच्या पूर्ततेसाठी गेलो होतो. विलासराव शिंदे यांच्या या इच्छा जयंत पाटील यांनी पूर्ण कराव्यात. राष्ट्रवादीस पक्षात कोणत्याही पदाच्या अपेक्षेने प्रवेश केला नाही. द्याल ती जबाबदारी पूर्ण करू. पुन्हा इकडेतिकडे करणार नाही.

जिल्हाध्यक्ष, अविनाश पाटील, ॲड. बाबासाहेब मुळीक, बाळासाहेब पाटील, नगराध्यक्षा स्नेहा माळी, आनंदराव पाटील, झुंजारराव शिंदे, भाग्यश्री शिंदे, झुंजारराव पाटील, विशाल शिंदे, विराज शिंदे, प्रकाश रुकडे, विजय पाटील, अल्लाउद्दीन चौगुले, संग्रामसिंह फडतरे आदी उपस्थित होते.

जितेंद्र पाटील, आफताब पिरजादे, शाहुराजे चव्हाण, प्रशांत पाटील, प्रमोद माळी, सुरेश मालेकर, मौला महाबरी, पीयूष ढोले, संदीप गायकवाड, शिरीष पवार आदींनी पक्ष राष्ट्रवादीत प्रवेश केला.

Web Title: BJP's tendency is to take advantage of the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.