तासगावात राष्ट्रवादीच्या बंडखोरांना भाजपचे बक्षीस

By Admin | Updated: September 25, 2015 00:08 IST2015-09-24T22:38:25+5:302015-09-25T00:08:25+5:30

नगरपालिका : भाजपच्या सत्तेत आबा गटाचा सहभाग कायम?

BJP's reward for NCP rebels | तासगावात राष्ट्रवादीच्या बंडखोरांना भाजपचे बक्षीस

तासगावात राष्ट्रवादीच्या बंडखोरांना भाजपचे बक्षीस

दत्ता पाटील - तासगाव -तासगाव नगरपालिकेतील आबा गटाच्या तीन शिलेदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापैकी एकाला नगराध्यक्ष पदाची लॉटरी लागली, तर अन्य चार नगरसेवकांनी राष्ट्रवादीत राहून भाजपच्या नव्या नगराध्यक्ष निवडीसाठी रसद पुरवली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या बंडखोर नगरसेवकांना भाजपकडून सत्तेचे बक्षीस मिळणार का, याची उत्सुकता आहे. भाजपच्या सत्तेत राष्ट्रवादीच्या बंडखोरांचा सहभाग कायम राहण्याची शक्यता असून, विद्यमान उपनगराध्यक्ष सुरेश थोरात यांचे उपनगराध्यक्षपद कायम राहण्याची शक्यता आहे.
तासगाव नगरपालिकेत महिन्याभरात अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या. भाजपच्या व्यूहरचनेमुळे राष्ट्रवादी पुरती नामोहरम झाली. राष्ट्रवादीच्या पाठबळावर नगराध्यक्ष असणाऱ्या संजय पवार यांना भाजपच्या खेळीमुळे पायउतार व्हावे लागले, तर राष्ट्रवादीतील तीन नगरसेवकांना भाजपमध्ये खेचून तसेच अन्य पाच नगरसेवकांना पक्षाच्या नेत्यांविरोधात निर्णय घ्यायला भाग पाडून खासदार संजय पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची कोंडी केली, किंंबहुना तासगाव नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा नगराध्यक्ष करण्याची किमया साधली. खासदार पाटील यांनी केलेल्या खेळीत आबा गटाचा वाटा महत्त्वाचा मानला जातो. नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी आवश्यक मॅजिक फिगर जुळवण्यासाठी राष्ट्रवादीच्या सात नगरसेवकांची आवश्यकता होती. त्यामुळे खासदार पाटील यांनी तीन नगरसेवकांना पक्षात घेऊन, तर अन्य चार नगरसेवकांचा पाठिंबा मिळवून सत्तेचे सिंंहासन ताब्यात घेतले.
राष्ट्रवादीतील चार बंडखोर नगरसेवकांमध्ये विद्यमान उपनगराध्यक्ष सुरेश थोरात यांचाही समावेश आहे. राष्ट्रवादीच्या बंडखोर नगरसेवकांमुळेच भाजपचा नगराध्यक्ष बदलाचा मार्ग सुकर झाला. त्यामुळे भाजपकडून या नगरसेवकांना सत्तेचे बक्षीस मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भाजपकडून पहिल्यांदा सुशिला साळुंखे यांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली आहे. त्यांचा कालावधी पूर्ण होईपर्यंत थोरात यांना कायम ठेवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तसेच उर्वरित कालावधितही राष्ट्रवादीच्या बंडखोर नगरसेवकांनाच संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


नेत्यांचा आदेश झुगारला
तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये संघर्षाची तटबंदी उभी राहिली असली तरी, नगरपालिकेच्या राजकारणात पक्षांच्या नेत्यांचा आदेश झुगारून का होईना, राष्ट्रवादी आणि भाजपची एकत्रित सत्ता राहण्याची शक्यता दिसून येत आहे.४खासदार संजय पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची कोंडी केली, किंंबहुना तासगाव नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा नगराध्यक्ष करण्याची किमया साधली.
खासदार पाटील यांनी केलेल्या खेळीत आबा गटाचा वाटा महत्त्वाचा मानला जात असल्याची चर्चा आहे.

Web Title: BJP's reward for NCP rebels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.