आगामी निवडणुकीसाठी भाजपचे शक्तिप्रदर्शन
By Admin | Updated: August 13, 2016 00:42 IST2016-08-12T23:54:50+5:302016-08-13T00:42:09+5:30
पृथ्वीराज देशमुखांचे कौतुक : वाईन पार्कच्या जागेवरून पतंगराव कदम यांच्यावर निशाणा

आगामी निवडणुकीसाठी भाजपचे शक्तिप्रदर्शन
प्रताप महाडिक -- कडेगाव --मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रायगाव (ता. कडेगाव) येथे शुक्रवारी आयोजित शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. जवळपास २५ ते ३० हजार शेतकरी या मेळाव्यासाठी उपस्थित होते. यामध्ये पलूस, कडेगाव विधानसभा मतदारसंघातील संख्या लक्षणीय होती.
पृथ्वीराज देशमुख यांनी सुरू केलेल्या एकत्रित ठिबक सिंचन प्रकल्पाचा मुख्यमंत्र्यांनी मेळाव्यात उल्लेख केला. तत्पूर्वी देशमुख यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते करण्याचा मनोदय व्यक्त केला. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी, हा प्रकल्प १० हजार एकरापर्यंत विस्तारित करावा, यासाठी सर्वतोपरी मदत करू आणि पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते उद्घाटन करू, असा शब्द दिला.
देशमुख यांनी आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जोरदार भाषणबाजी केली. कॉँग्रेस व राष्ट्रवादीला मुख्यमंत्र्यांची भीती वाटत असल्याचा टोला लगावत, आगामी निवडणुकांत जिल्ह्यात भाजपला पूर्ण बहुमत मिळवून देऊ, असा निर्धार व्यक्त केला. त्यांचे प्रतिस्पर्धी कॉँग्रेसचे माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या काळात सुरू झालेल्या पलूस वाईन पार्कची जागा काढून घेऊन अन्य उद्योगांना देण्याचा सल्लाही त्यांनी दिला. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनीही देशमुख यांचे कौतुक केले.
या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांकडून जलसिंचन योजना बारमाही सुरू ठेवण्याबाबत आणि वीज बील सरकार भरण्यासंदर्भात घोषणा होईल, याकडेही शेतकऱ्यांनी कान लागले होते. परंतु, मुख्यमंत्र्यांनी तशी कोणतीच घोषणा न करता जलसिंचन योजनांना वीज उपलब्ध करण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प योजना राबविण्यात येणार असल्याचा उल्लेख केला.
‘वालचंद’च्या वादावर पडदा?
वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वादामुळे खा. संजयकाका पाटील मेळाव्याला उपस्थिती लावणार का व या मेळाव्यात हा वाद पुन्हा चर्चेत येणार का?, असे सवाल उपस्थित होत होते. परंतु, खा. पाटील यांनी मेळाव्याला हजेरी लावून, राजकीय पटलावर एकसंध असल्याचे दाखवत ‘वालचंद’च्या वादावर पडदा टाकला. शिवाय भाजपाचे जिल्हाध्यक्ष देशमुख यांची जलसिंचन योजनांची वीज बिले सरकारने भरण्याची केलेली मागणी खा. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे सरकवली.