पोटनिवडणुकीसाठी भाजपचे सूर बिघडले
By Admin | Updated: March 16, 2015 00:05 IST2015-03-15T23:12:25+5:302015-03-16T00:05:30+5:30
भाजप हा शिस्त असलेला पक्ष म्हटले जात असले तरी, जिल्ह्यातील पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये कोणतीही एकवाक्यता नाही.

पोटनिवडणुकीसाठी भाजपचे सूर बिघडले
सांगली : माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी सुमनतार्इंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर, राष्ट्रवादीने बिनविरोधसाठी सर्व पक्षांना आवाहन केले. काँग्रेस, शिवसेना, मनसे, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना अशा सर्वच पक्षांनी या आवाहनास लगेच प्रतिसाद देऊन उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला. मात्र भाजपचे घोडे अद्याप अडलेलेच आहे. बिनविरोधच्या मुद्द्यावरून भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांचे सूर बिघडले आहेत. त्यामुळे याबाबत पक्षीय स्तरावर काय निर्णय होणार, याकडे कार्यकर्त्यांचे आणि जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम १0 मार्च रोजी जाहीर झाला. त्यानंतर लगेचच राजकीय हालचालींना वेग आला. राष्ट्रवादीकडून उमेदवारी कोणाला दिली जाणार, याकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागले होते. शनिवारी अजित पवारांनी आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनतार्इंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर, भाजप वगळता सर्वच पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला. पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या मुद्यावरून भाजपमध्ये दोन गट पडले आहेत. अन्य पक्षांप्रमाणे सुमनतार्इंना भाजपनेही पाठिंबा द्यावा, असे मत जिल्ह्यातील काही नेत्यांनी मांडले, तर काहींनी निवडणूक लढविण्याचा विचार मांडला. दोन मतप्रवाह निर्माण झाल्यामुळेच भाजपचा याबाबत निर्णय होऊ शकला नाही.
सुमनतार्इंची उमेदवारी एकीकडे जाहीर होत असतानाच, भाजपचे खासदार संजय पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी कवठेमहांकाळ येथे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन या मुद्द्यावर चर्चा केली. कार्यकर्त्यांचीच भावना महत्त्वाची आहे, असे मत घोरपडे यांनी व्यक्त केले होते. कार्यकर्त्यांनी काय भावना मांडल्या, याची माहिती त्यांनी दिली नाही. निवडणूक बिनविरोधची कार्यकर्त्यांची भावना असती, तर दोन्ही नेत्यांना मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे कारण नव्हते. त्यामुळे निवडणूक लढविण्याबाबत कार्यकर्ते आग्रही असल्याची चर्चा रंगली आहे. सोमवारी यासंदर्भात पक्षीय स्तरावर निर्णय होणार असल्याने या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
पक्षांतर्गत गोंधळ
भाजप हा शिस्त असलेला पक्ष म्हटले जात असले तरी, जिल्ह्यातील पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये कोणतीही एकवाक्यता नाही. निवडणुकीबाबत कवठेमहांकाळ येथे बैठक घेतली जात असताना, त्यावेळी भाजपचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. गेल्या पंधरा दिवसांपासून ही चर्चा सुरू असताना जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी, नेते एकत्र येऊन यावर चर्चा करू शकले नाहीत.