फोटो ओळ :- शिराळा येथे ओबीसी आरक्षण मिळावे या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा व ओबीसी आरक्षण रद्द झाले. राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिराळा येथे भारतीय जनता पक्षाच्यावतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांनी केले.
येथील बस स्थानकाजवळ रस्त्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
शिवाजीराव नाईक म्हणाले, ओबीसी समाजाचे आरक्षण भाजप सरकारने मिळवून दिले होते. त्याचबरोबर मराठा आरक्षणदेखील भाजप सरकारने दिले. परंतु दोन्ही आरक्षणांचा विषय महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर रद्द झाला, या सरकारचा नाकर्तेपणा असून हे सरकार जनतेच्या नजरेतून पूर्णपणे फेल गेलेले आहे.
सत्यजित देशमुख म्हणाले की, ओबीसी समाजाचे आरक्षण हे या सरकारच्या असंवेदनशीलतेमुळे गेलेले आहे. सरकारला न्यायालयात आपली बाजू योग्य पद्धतीने मांडता आली नाही, परिणामी ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झालेले आहे. या समाजाला न्याय देण्यासाठी राज्य सरकारने योग्य पावले उचलणे गरजेचे आहे.
यावेळी रणजीतसिंह नाईक, महादेव कदम, आनंदराव पाटील, रघुनाथ पाटील, वैभव गायकवाड, संभाजी नलवडे, पांडुरंग गायकवाड, आनंदराव पाटील, सचिन यादव, धनाजी नरुटे, उत्तम गावडे, संग्राम पवार, सुनील गुरव आदीसह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.