भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊ नये

By Admin | Updated: October 30, 2014 01:14 IST2014-10-30T01:13:55+5:302014-10-30T01:14:17+5:30

राजू शेट्टी : नव्या सरकारच्या मंत्रिमंडळातील सहभागाबाबत संघटना आग्रही

BJP should not support NCP | भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊ नये

भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊ नये

सांगली : भाजप व सेनेत पुन्हा युती व्हावी, यासाठी मी कोणत्याही प्रकारची मध्यस्थी केलेली नाही. त्या भानगडीत मी पडणार नाही. सरकार स्थापन करताना कोणाचा पाठिंबा घ्यायचा, याचे अधिकार भाजपलाच आहेत. तरीही त्यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊ नये, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. राज्यातील नव्या मंत्रिमंडळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सहभागी करून घ्यावे, यासाठी आम्ही आग्रही आहोत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शेट्टी म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एकही आमदार निवडून येऊ शकला नाही. जनतेचा हा कौल आम्हाला मान्य आहे. विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपावरून फूट पडलेली नाही. काहींनी पक्ष सोडला असला तरी, निष्ठावंत कार्यकर्ते अजूनही आमच्याकडे आहेत.
उल्हास पाटील यांनी सुरू केलेल्या स्वतंत्र ऊस परिषदेबाबत शेट्टी म्हणाले की, आधीच शेतकऱ्यांच्या तीन संघटना आहेत. त्यात आणखी एकाची भर पडली तर, चांगली गोष्ट आहे. जेवढी स्पर्धा होईल, तेवढे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे. कोणाच्या जाण्याने संघटनेला फरक पडणार नाही. आक्रमक कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही संघटनबांधणी केली होती. अशा लोकांना अन्य पक्षांनी आमिष दाखवून फोडले, तरीही संघटना अजूनही मजबूत आहे. आम्ही त्या जोरावर पुढील वाटचाल करू. निष्ठावंतांना तिकीट वाटपात डावलल्याचा आरोप चुकीचा आहे. वीस-वीस वर्षे काम करणाऱ्यांनाही आम्ही उमेदवारी दिली आहे.
शिरोळमधील उमेदवारीबाबत पाच वर्षांपूर्वीच आम्ही शब्द दिला होता. त्यामुळे उल्हास पाटील यांना उमेदवारी देऊ शकलो नाही. इस्लामपूर मतदारसंघात पक्षविरहीत एकास एक लढतीचा निर्णय झाला होता. केवळ कॉँग्रेसमुळे हा बेत फसला. ऐनवेळी त्यांनी पक्षाचा उमेदवार उभा केला. अन्य ठिकाणच्या उमेदवारीबाबत संघटनेच्या कार्यकारिणीने निर्णय घेतले आहेत. सर्वांचेच समाधान होऊ शकले नाही, ही गोष्ट खरी असली तरी, यातून संघटनेत फूट पडली, असा अर्थ कुणीही घेऊ नये.
...तर शांतपणे बाजूला होईन
लोकांना ज्यावेळी वाटेल की शेट्टींचे नेतृत्व आता कामाचे नाही, त्यावेळी मी स्वत:हून शांतपणे राजकारणातून, चळवळीतून बाजूला होईन. माझ्या मुलाला, नातेवाईकांना संघटनेचे नेतृत्व द्यावे, अशी मागणी कधीच करणार नाही, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.
संघटनेत माझ्यानंतर सर्वात ज्येष्ठ म्हणून सदाभाऊ खोत यांचा नंबर लागतो. त्यामुळे मंत्रिमंडळात स्थान मिळाले तर, त्यांनाच प्राधान्य दिले जाईल. किती व कोणते खाते मिळेल, यावर या गोष्टी अवलंबून आहेत. आताच काही सांगता येत नाही, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: BJP should not support NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.