भाजप, राष्ट्रवादीचे निवडणुकीसाठी स्टार्टअप
By Admin | Updated: January 28, 2016 00:15 IST2016-01-27T23:37:02+5:302016-01-28T00:15:01+5:30
तासगाव नगरपालिका : नेत्यांकडून सत्ता काबीज करण्यासाठी मोर्चेबांधणी

भाजप, राष्ट्रवादीचे निवडणुकीसाठी स्टार्टअप
दत्ता पाटील -- तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीला आणखी काही महिन्यांचा अवधी आहे. मात्र आतापासूनच भाजप आणि राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी स्टार्टअप केल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीने खासदार सुप्रिया सुळे यांना, तर भाजपने गृहराज्यमंत्री राम शिंदे यांना तासगावात आणून नगरपालिका निवडणुकीत सत्ता काबीज करण्याचे संकेत दिले आहेत.
तासगाव नगरपालिकेतील विद्यमान कारभाऱ्यांची मुदत आॅक्टोबरमध्ये संपणार आहे. त्यामुळे पालिकेच्या निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजत आहेत. पालिकेच्या राजकारणात चार वर्षात मोठी राजकीय स्थित्यंतरे झालेली आहेत. या स्थित्यंतरांमुळे पालिकेची निवडणूक कशी होणार? याचे मोठे औत्सुक्य आहे. खासदार संजयकाका पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पालिकेतील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याशी निष्ठा असलेल्या काही नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पालिकेची सत्ता भाजपच्या ताब्यात आली. आता भाजपकडून आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली जात आहे. केंद्रात आणि राज्यात असलेल्या सत्तेचा पुरेपुर फायदा घेऊन पुढची पाच वर्षे भाजपचा झेंडा फडकवण्याचा भाजपच्या नेत्यांचा इरादा आहे.
शहरातील पाणी योजनेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने गृहराज्यमंत्र्यांचा तासगाव दौरा झाला. या दौऱ्यात गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे तासगाव पालिकेच्या निवडणुकीतही भाजपची सत्ता येईल, त्यासाठी मागणी होईल, तेवढा निधी प्राधान्याने देण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले होते. तर खासदार संजयकाका पाटील यांनीही पालिकेच्या निवडणुकीचा उल्लेख करुन निवडणुकीपूर्वी शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यामुळे गृहराज्यमंत्र्यांच्या दौरा पालिका निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठीच होता, हे स्पष्ट झाले आहे.
दुसरीकडे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर तासगाव शहरात राष्ट्रवादीला अनेक धक्के बसले आहेत. आता या धक्क्यातून सावरलेल्या राष्ट्रवादीनेही पालिकेच्या निवडणुकीसाठी कंबर कसल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील काही शिलेदार भाजपमध्ये गेले, तर राष्ट्रवादीत असलेल्या काही शिलेदारांनी बॅकफूटवरच राहणे पसंत केल्याचे दिसून येत आहे. मात्र दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी पालिकेच्या निवडणुसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सुप्रिया सुळे यांचा तासगाव दौरा शहरातील कार्यकर्त्यांना रिचार्ज करण्यासाठीच असल्याची चर्चा होती. राष्ट्रवादीने जोरदार रॅली काढून खासदार सुळे यांचे स्वागत करुन शहरातील राष्ट्रवादीत अजूनही जोश असल्याचे दाखवून दिलेच. किंबहुना खासदार सुळे यांनीही भाषणाच्या शेवटी निवडणुकीचा उल्लेख जाणीवपूर्वक केला. अजून निवडणुका लांब असल्याने सर्वांशी गोडच बोला, बाकीचे निवडणुकीवेळी पाहू, असा सूचक इशारा देऊन पवार कुटुंबियांचेही पालिकेच्या निवडणुकीकडे लक्ष असल्याचे स्पष्ट केले. एकंदरीत निवडणुकीला काही महिने बाकी असतानाच भाजप आणि राष्ट्रवादीकडून मोर्चेबांधणीस चांगलीच सुरुवात झाली आहे. तरीही उरलेल्या काही महिन्यांत तासगावात आणखी काही राजकीय उलथापालथ होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही.