भाजपचे खासदार; राष्ट्रवादीचे शिलेदार

By Admin | Updated: October 20, 2015 23:50 IST2015-10-20T23:13:36+5:302015-10-20T23:50:19+5:30

३८ ग्रामपंचायतीत सामना : आबा-काका गटात वर्चस्वासाठी जोरदार रस्सीखेच

BJP MP; Nationalist Congressman | भाजपचे खासदार; राष्ट्रवादीचे शिलेदार

भाजपचे खासदार; राष्ट्रवादीचे शिलेदार

दत्ता पाटील-- तासगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज छाननीच्या प्रक्रियेतच मोराळे ग्रामपंचायत बिनविरोध करून भाजपने सत्तेचे सीमोल्लंघन केले आहे. भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी स्वत: लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रवादीच्या शिलेदारांनी पक्षीय नेत्यांवर अवलंबून न राहता स्वबळावर आपापली तटबंदी शाबूत राखण्यासाठी यंत्रणा लावल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजपचे खासदार, तर राष्ट्रवादीचे शिलेदार असेच चित्र दिसत आहे. पारंपरिक आबा आणि काका गटात वर्चस्वासाठी टोकाची रस्सीखेच होणार असल्याचेही दिसून येत आहे.
तासगाव तालुक्यातील संस्थांवर, स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व मिळवण्यासाठी ग्रामपंचायतींवर सत्ता असणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. याचा फटका खासदार संजयकाका पाटील यांना बाजार समितीच्या निवडणुकीत बसला होता.
भाजपचे जिल्ह्याचे नेतृत्व करत असताना, तासगावसारख्या होम ग्राऊंडवर वर्चस्व ठेवण्यासाठी खासदार पाटील यांनी यावेळी ग्रामपंचायत निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. त्यामुळे निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच तालुक्यातील प्रत्येक गावात थेट संपर्क ठेवला आहे. राष्ट्रवादीतील नाराज कार्यकर्त्यांना हेरुन, त्यांना भाजपमध्ये घेण्यासाठी राजकारणात अभिप्रेत असलेल्या सर्व शक्यतांचा वापर करून वर्चस्वासाठी लढाई सुरू केली आहे. अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेपासूनच वातावरण निर्मिती करण्यात संजयकाकांनी यश मिळविले. त्यामुळेच अर्ज दाखलच्या टप्प्यातच राष्ट्रवादीला धक्का देत मोराळे ग्रामपंचायतीतील सर्व सात जागा बिनविरोध करून भाजपचा झेंडा फडकविला. तसेच विजयनगर, हातनोली, डोर्ली, धोंडेवाडी येथील काही जागा बिनविरोध करण्यात यश मिळवले.
खासदार पाटील यांच्या आक्रमक राजकीय वाटचालीला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीत वरच्या पातळीवरून अद्यापही हालचाली होताना दिसत नाहीत. मात्र सद्यस्थितीत बहुतांश ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. वर्षानुवर्षे सत्तेत असल्याचा फायदा करून घेण्यासाठी तसेच स्वत:चा बालेकिल्ला कायम राखण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत:च्या गावापुरती व्यूहरचना केली आहे. राष्ट्रवादीतील प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी सत्ता कायम ठेवण्याचा चंग बांधूनच कंबर कसल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकीकडे खासदार संजयकाका पाटील, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे पदाधिकारी असेच चित्र दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत चुरशीचा रंग भरला आहे.
भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवून प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान आहे. त्यामुळे रणधुमाळीत सुरुवातीपासूनच भाजपचे खासदार संजयकाका पाटील मैदानात उतरुन व्यूहरचना आखत आहेत, तर राष्ट्रवादीकडून आमदार सुमनताई पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील आणि स्मिता पाटील यांनीही लक्ष केंद्रित केले आहे.

मोराळेचा प्रश्न : बिनविरोध जागांवर दावा
मोराळे ग्रामपंचायतीतील सात सदस्यांसह बिनविरोध निवडून आलेल्या १८ जागांवर खासदार संजयकाका पाटील यांच्या गटाने दावा केला आहे. विजयनगर ग्रामपंचायतीत सातपैकी पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत, तर दोन जागांसाठी निवडणूक लागणार आहे. बिनविरोध पाच जागांपैकी तीन जागा भाजपच्या असल्याचा दावा खासदार गटाकडून होत आहे, तर पाचपैकी चार जागा आबा गटाच्या असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून केला जात आहे. त्यामुळे बिनविरोध जागांवर दावा सांगण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच असल्याचे दिसून येत आहे.


बंडखोरी, नाराजीचा सामना
तालुक्यातील बहुतांश गावात भाजप आणि राष्ट्रवादीतच दुरंगी सामना होणार आहे. मात्र राष्ट्रवादीअंतर्गत काही गावांत दोन गट आहेत, तर भाजपलाही सत्तेची लागण झाली असल्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीबरोबरच भाजपलाही काही गावांत नाराजीचा सामना करावा लागणार आहे. तसेच नागाव (क), येळावी आणि जुळेवाडी येथे काँग्रेस मैदानात आहे. तसेच कवठेएकंदमध्ये शेकापची ताकद लक्षणीय आहे. त्यामुळे या गावांत भाजप आणि राष्ट्रवादीला काँग्रेस आणि शेकापचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र आहे.

ग्रामपंचायत
निवडणूक

Web Title: BJP MP; Nationalist Congressman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.