मिरज ग्रामीणमध्ये भाजपला बाळसे

By Admin | Updated: October 23, 2014 00:07 IST2014-10-22T22:04:03+5:302014-10-23T00:07:26+5:30

मोदींचा प्रभाव कायम : काँग्रेसला मतदारांनी झिडकारले

BJP in Miraj Rural | मिरज ग्रामीणमध्ये भाजपला बाळसे

मिरज ग्रामीणमध्ये भाजपला बाळसे

प्रवीण जगताप -लिंगनूर -मिरज मतदारसंघावर भाजपने पकड मजबूत केली आहे, हे सुरेश खाडे यांच्या ६४ हजारांच्या मताधिक्यावरून स्पष्ट होत आहे. ग्रामपंचायती व पंचायत समितीवर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची फळी नेतृत्व करीत असूनही नेते व कार्यकर्त्यांना मतदारसंघात ताकद सिद्ध करता आली नाही.
मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केल्याने, भाजपने पाळेमुळे घट्ट केली आहेत. ग्रामपंचायत, पंचायत समितीत नगण्य स्थान असतानाही सलग दुसऱ्यांदा वाढीव मताधिक्यासह दुसरी टर्म खाडे यांना मिळाली आहे. त्यामुळे मतदारसंघात व ग्रामीण भागातही भाजपने बाळसे धरले आहे. कॉँग्रेस, बंडखोर व राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या मतांची बेरीजही भाजपच्या आकड्यापर्यंत पोहोचत नसल्याने सर्व भाजपेतर नेत्यांना व कार्यकर्त्यांना या निकालाने चपराक दिली आहे. त्यांना आता अंतर्मुख होऊन नव्याने बांधणी करावी लागणार आहे.
राष्ट्रवादीला जयंत पाटील यांची सोबत असूनही १० हजारांच्या आसपासच समाधान मानावे लागले, तर शिवसेनेलाही २० हजारांच्या घरातच थांबावे लागले.
अलीकडच्या काही निवडणुकांमध्ये ग्रामपंचायतीला मदन पाटील व विधानसभेला अजितराव घोरपडे यांच्या नेतृत्वालाच विजय मिळत होता. गतवेळच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला घोरपडे गटाची मदत उपयोगी पडली होती. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला घोरपडे गटात असूनही राष्ट्रवादीतून कार्यरत असणाऱ्यांची मदत मिळेल असे वाटत होते. पण पूर्व भागातून ती प्रत्यक्षात मिळाली की नाही, याचीही तपासणी करण्याइतपत राष्ट्रवादीला मतदान मिळाले आहे. त्यामुळे पूर्व भागातील घोरपडे गटाने कमळच हातात घेतले की काय?, अशी कुजबूज सुरू आहे.
कॉँग्रेसची तर तिकीट वाटपापासूनच बिकट अवस्था झाली. माजी मंत्री मदन पाटील व प्रतीक पाटील यांनी संमती दिलेल्या उमेदवारास अंतिमक्षणी तिकीटच मिळाले नाही. सिद्धार्थ जाधव यांनी बाजी मारली. पण ती बाजी विजयासाठी पुरेशी ठरली नाही. त्यामुळे बंडखोरी झाली. कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांची शहरी फळी एकासोबत, तर ग्रामीण फळी बंडखोरासोबत, या सर्व परिस्थितीत इतर सर्व पक्षांच्या उमेदवारांना सामान्य मतदारांनी झिडकारले. या निवडणुकीत ग्रामीण भागात मोदी यांची लाट फारशी ओसरली नसल्याचे दिसून आले. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या बळापेक्षा पंतप्रधान मोदी यांच्या प्रभावाखाली मतदान अधिक झाले. त्यामुळे ग्रामीण भागातून प्रभाव नसतानाही खाडेंना मताधिक्य मिळाले.
घोरपडे गटाची मदत
गतवेळच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला घोरपडे गटाची मदत उपयोगी पडली होती. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला घोरपडे गटात असूनही राष्ट्रवादीतून कार्यरत असणाऱ्यांची मदत मिळेल असे वाटत होते. पण पूर्व भागातून ती प्रत्यक्षात मिळाली की नाही, याचीही तपासणी करण्याइतपत राष्ट्रवादीला मतदान मिळाले आहे. त्यामुळे पूर्व भागातील घोरपडे गटाने कमळच हातात घेतले की काय?, अशी कुजबूज सुरू आहे.

Web Title: BJP in Miraj Rural

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.