फोडाफोडीच्या भीतीने भाजपचे सदस्य हैद्राबादला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:31 IST2021-09-04T04:31:20+5:302021-09-04T04:31:20+5:30
सांगली : महापौर निवडीवेळी झालेली फोडाफोडी पाहता महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत भाजप कोणतीही जोखीम पत्करण्यास तयार नाही. निवडणुकीला ...

फोडाफोडीच्या भीतीने भाजपचे सदस्य हैद्राबादला रवाना
सांगली : महापौर निवडीवेळी झालेली फोडाफोडी पाहता महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत भाजप कोणतीही जोखीम पत्करण्यास तयार नाही. निवडणुकीला सहा दिवस शिल्लक असताना शुक्रवारी भाजपच्या नऊ सदस्यांना हैद्राबादच्या सहलीवर पाठविण्यात आले. दरम्यान, काँग्रेसने नाराज भाजप नगरसेवकांशी संपर्क साधून फोडाफोडीला सुरुवात केली आहे. त्यामुळे या निवडणुकीतही राजकीय खेळ रंगणार आहे.
फेब्रुवारीत झालेल्या महापौर, उपमहापौर निवडीत भाजपचे सात नगरसेवक काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गळाला लागले. त्यामुळे बहुमत असूनही भाजपला पराभव स्वीकारावा लागला. सध्या महापालिकेत स्थायी समितीत भाजपचे वर्चस्व आहे. ते कायम ठेवण्यासाठी भाजपची धडपड सुरू आहे. पण भाजप अंतर्गत कुरघोड्यांचे राजकारण सुरू झाल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.
स्थायी समितीत भाजपचे ९, काँग्रेसचे ४ तर राष्ट्रवादीचे ३ सदस्य आहेत. काँग्रेसला सभापतीपदाची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून करण जामदार, संतोष पाटील यांची नावे चर्चेत आहेत. त्यात जामदार यांचे वडील माजी महापौर किशोर जामदार फोडाफोडीच्या राजकारणात माहीर आहेत. त्यांनी भाजपच्या काही असंतुष्ट नगरसेवकांशी संपर्क साधल्याची चर्चा आहे. काँग्रेसने फोडाफोडीला सुरुवात केल्याची कुणकूण लागताच भाजपचे नेते सावध झाले. शुक्रवारी पक्षाच्या नऊ सदस्यांना त्यांनी हैद्राबाद सहलीवर पाठविण्यात आले.
चौकट
भाजपच्या उमेदवारीचे त्रांगडे
सभापतीपदाची निवडणूक ९ सप्टेंबर रोजी ऑनलाईन होणार आहे. त्यासाठी ८ रोजी उमेदवारी अर्ज भरले जातील. उमेदवारी निश्चित नसताना भाजपने सदस्यांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. भाजपकडून निरंजन आवटी, सविता मदने, संजय यमगर, जगन्नाथ ठोकळे यांची नावे चर्चेत आहेत. या चौघांसाठी भाजपमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे. एकमेकांचा पत्ता कापण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे.
चौकट
काँग्रेसला टीप
भाजपमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच असून, एका गटाला उमेदवारी दिल्यास दुसरा गट नाराज होणार आहे. उमेदवारीच्या प्रबळ दावेदाराला खिंडीत गाठण्यासाठी भाजपकडून नाराज नगरसेवकांची टीप काँग्रेसला दिली जात आहे. एका नगरसेवकाच्या नातलगाशी काँग्रेस नेत्याने संपर्क केला होता, तर दुसऱ्या एकासोबत चर्चाही झाल्याचे समजते.