जयंत पाटलांच्या सासुरवाडीत भाजपचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:28 IST2021-01-19T04:28:03+5:302021-01-19T04:28:03+5:30
म्हैसाळमध्ये १७ पैकी भाजपला तब्बल १५, तर राष्ट्रवादीला केवळ दोन जागांवर विजय मिळाला. ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले आहे. भाजपने येथे ...

जयंत पाटलांच्या सासुरवाडीत भाजपचा झेंडा
म्हैसाळमध्ये १७ पैकी भाजपला तब्बल १५, तर राष्ट्रवादीला केवळ दोन जागांवर विजय मिळाला. ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले आहे. भाजपने येथे सत्ता खेचून आणली असून, सासुरवाडीतील राष्ट्रवादीचा पराभव हा जयंत पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे. येथे मनोज शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. निवडणुकीत जयंत पाटील यांचा लहान मेहुणा, मोठ्या मेहुण्याची पत्नी आणि मेहुण्याची मुलगी पराभूत झाली आहे.
निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली. आबासाहेब शिंदे व मोहनराव शिंदे ग्रामविकास पॅनेल विरुद्ध श्री कनकेश्वर परिवर्तन पॅनेल अशी लढत होती. भाजपच्या परिवर्तन पॅनेलने १७ पैकी १५ जागा जिंकून विजय मिळविला, तर ग्रामविकास पॅनेलने दोन जागा जिंकल्या. ग्रामविकास पॅनेलचे नेतृत्व राष्ट्रवादीचे नेते मनोज शिंदे, सांगली साखर कारखान्याचे संचालक दौलतराव शिंदे, जिनेश्वर पाटील यांनी, तर परिवर्तन पॅनेलचे नेतृत्व भाजपचे नेते दीपक शिंदे, श्रीमती अलकादेवी शिंदे, आबासाहेब शिंदे यांनी केले.
गावात सध्या पाच राजकीय गट आहेत. मनोज शिंदे, दीपक शिंदे व माजी सरपंच आबासाहेब शिंदे, माजी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य केदारराव शिंदे, पंचायत समिती सदस्य बंडू पाटील, धनराज शिंदे यांचे पाच वेगवेगळे गट आहेत. मात्र भाजपविरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना होता. मनोज शिंदे गट एका बाजूला, तर इतर सर्व गट दुसऱ्या बाजूला, अशी सरळ लढत झाली.
चौकट
विकासकामे केली, तरीही सत्तांतर
मनोज शिंदे-म्हैसाळकर गटाने गेल्या दहा वर्षांत १६ कोटीची विकासकामे केली आहेत, तरीही गावात सत्तांतर झाले. याची चर्चा सुरू आहे.