भाजपमधील खबऱ्याला समज
By Admin | Updated: December 30, 2014 23:26 IST2014-12-30T22:33:51+5:302014-12-30T23:26:43+5:30
नेत्यांकडे तक्रार : गोपनीय माहिती फोडल्याने नाराजी

भाजपमधील खबऱ्याला समज
सांगली : पुणे येथे झालेल्या बैठकीसह पक्षातील गोपनीय बैठकांची व हालचालींची माहिती बाहेर सांगणाऱ्या कुपवाडमधील एका भाजप नेत्याला जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी खडसावले. या नेत्याबाबत पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडेही तक्रार करण्यात आली असून, या प्रकाराबाबत समज देण्यात आली आहे.
पक्षातील एका महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याने सांगितले की, भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे. त्यामुळे अशा गोष्टी या पक्षात चालणार नाहीत. यापूर्वीही पक्षांतर्गत गोष्टींबाबत संबंधित नेत्याने बाहेर माहिती पुरविली होती. त्यावेळीही त्यांना समज देण्यात आली होती. त्यांनी हे प्रकार थांबविले नाहीत, तर त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. पुण्यातील भाजप नेत्यांच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेची माहिती संबंधित नेत्याने बाहेर अनेकांना पुरविली. त्यामुळे पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सांगली दौऱ्यावेळी हा विषय उपस्थित झाला.
माधवनगर रस्त्यावरील विश्रामगृहात काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याविषयी तक्रार केली. पालकमंत्र्यांनीही त्या नेत्यास समज देऊन यापुढे कारवाई केली जाईल, असा इशाराही दिल्याचे समजते. या वृत्तास एका पदाधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे. (प्रतिनिधी)