भाजप नगरसेवकांचा नगररचना विभागासमोर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:49 IST2021-03-13T04:49:32+5:302021-03-13T04:49:32+5:30
सांगली : महापालिकेच्या नगररचना विभागातील अनागोंदी कारभाराविरोधात शुक्रवारी भाजपच्या नगरसेवकांनी कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन केले. पंतप्रधान आवास योजनेतील घरांचे बांधकाम ...

भाजप नगरसेवकांचा नगररचना विभागासमोर ठिय्या
सांगली : महापालिकेच्या नगररचना विभागातील अनागोंदी कारभाराविरोधात शुक्रवारी भाजपच्या नगरसेवकांनी कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन केले. पंतप्रधान आवास योजनेतील घरांचे बांधकाम परवाने अडविण्यात आले आहेत. राजर्षी शाहू काॅलनीतील सामाजिक सभागृहाच्या दुसऱ्या मजल्यालाही परवाना देण्यास विलंब लावला आहे. एजंटांची कामे गतीने होतात; पण गोरगरिबांच्या फायली मात्र अडविल्या जात असल्याचा आरोप नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी केला.
प्रधानमंत्री आवास योजना समितीचे सभापती ठोकळे यांच्या प्रभागात एक सामाजिक सभागृह मंजूर आहे. या सभागृहाचे पहिल्या मजल्याचे काम पूर्ण झाले असून, दुसऱ्या मजल्याचे बांधकाम प्रस्तावित आहे. त्याचा बांधकाम परवाना देण्यास नगररचना विभागाकडून टाळाटाळ केली जात होती. प्रधानमंत्री आवास योजनेतून काहीजणांना घरे मंजूर झाली आहे. त्यांच्या परवान्यासाठी गोरगरीब लोक हेलपाटे मारत आहेत. तरीही नगररचनातील अधिकारी मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. याविरोधात शुक्रवारी सकाळी जगन्नाथ ठोकळे यांनी नगररचना कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.
त्यानंतर भाजपचे सभागृह नेते विनायक सिंहासने, माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, संजय यमगर, नसीम शेख, गीतांजली ढोपे-पाटील, ऊर्मिला बेलवलकर, दिगंबर जाधव यांनी नगररचना कार्यालयाकडे धाव घेतली. या नगरसेवकांनी कार्यालयासमोर ठिय्या मारला. उपायुक्त राहुल रोकडे यांनी आंदोलक नगरसेवकांची भेट घेऊन त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या. त्यानंतर नगरचनाच्या साहाय्यक संचालक एम. ए. मुल्ला यांनी सभागृहाच्या बांधकाम परवान्यावर तातडीने सही केली. उर्वरित कामेही लवकरच मार्गी लावली जातील, असे आश्वासन उपायुक्तांनी दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.