भाजपचे नगरसेवक काँग्रेसच्या गळाला
By Admin | Updated: November 16, 2016 23:24 IST2016-11-16T23:24:58+5:302016-11-16T23:24:58+5:30
विधानपरिषद निवडणूक : राष्ट्रवादीच्या बैठका सुरू; राजकीय हालचाली गतिमान

भाजपचे नगरसेवक काँग्रेसच्या गळाला
सांगली : विधानपरिषद निवडणुकीसाठी येत्या १९ नोव्हेंबररोजी मतदान होत असल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कमी कालावधी राहिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.
काँग्रेसच्या गळाला भाजपचे सांगली जिल्ह्यातील सहा नगरसेवक लागल्याची चर्चा आहे. आणखी काही नगरसेवक खेचण्यासाठी काँग्रेस नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसअंतर्गत वाद मिटल्याने राष्ट्रवादी सतर्क झाली असून सांगली, सातारा जिल्ह्यात बुधवारी मतदारांच्या बैठका झाल्या.
सांगली-सातारा विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सरळ लढत होत आहे. काँग्रेसतर्फे मोहनराव कदम आणि राष्ट्रवादीतर्फे शेखर गोरे मैदानात आहेत.
काँग्रेसचे बंडखोर उमेदवार शेखर माने आणि सातारा जिल्ह्यातील अपक्ष उमेदवार मोहनराव गुलाबराव कदम यांचेही अर्ज आहेत. मात्र बंडखोर गटाने मंगळवारी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा दिल्याने आता राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असाच सामना रंगणार आहे. मतदारांच्या भेटीगाठीसाठी आता दोनच दिवस शिल्लक असल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्याचे चित्र आहे.
पायाला भिंगरी लावून दोन्ही उमेदवार व पक्षाचे नेते सांगली आणि सातारा जिल्ह्यात मतदारांच्या भेटीसाठी जात आहेत. भाजपने अद्याप पक्षीयस्तरावर कोणतीही भूमिका स्पष्ट केली नसल्यामुळे त्यांच्या नगरसेवकांवर दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांचा डोळा आहे. काँग्रेसच्या गळाला भाजपचे जिल्ह्यातील सहा सदस्य लागले असून आणखी काही सदस्यही त्यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादीकडूनही भाजपच्या सदस्यांशी संपर्क साधला जात आहे. काँग्रेसअंतर्गत बंडखोरीला पूर्णविराम मिळाल्याने राष्ट्रवादी सतर्क झाली असून त्यांनी राष्ट्रवादीच्या मतांसह अतिरिक्त मतांसाठी ‘फिल्डिंग’ लावली आहे. दोन्ही काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी मंगळवारपासून मतदारांच्या भेटीगाठीवर, बैठकांवर जोर दिला आहे. (प्रतिनिधी)
१९ रोजी मतदान : चार ठिकाणी सोय
सांगली जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी खानापूर भाग विटा यांचे कार्यालय, तहसील कार्यालय इस्लामपूर, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली (अल्पबचत हॉल) व तहसील कार्यालय जत या चार मतदान केंद्रांवर १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे.
नेत्यांची कसरत
दोन्ही काँग्रेसमधील काही नेत्यांना एकाचवेळी विधानपरिषद आणि स्थानिक पातळीवर नगरपालिका निवडणूक राजकारणात लक्ष घालावे लागत असल्याने, त्यांची दोन्ही बाजूंनी कसरत सुरू आहे.