मराठी माध्यमांच्या शाळा संपविण्याचे भाजपचे षड्यंत्र
By Admin | Updated: November 22, 2015 00:04 IST2015-11-21T23:49:32+5:302015-11-22T00:04:25+5:30
पतंगराव कदम : मुख्याध्यापक अधिवेशनात सरकारवर हल्ला

मराठी माध्यमांच्या शाळा संपविण्याचे भाजपचे षड्यंत्र
विटा : मी शिक्षणमंत्री असताना शिक्षणात विद्यार्थी व लोकांच्या हिताचे निर्णय घेतले. परंतु, आताचे भाजप सरकार शिक्षणात दररोज नवनवीन निर्णय पारित करून ग्रामीण आदिवासी व डोंगरी भागातील मराठी माध्यमांच्या शाळा संपविण्याचे षड्यंत्र करीत असल्याचा आरोप माजी मंत्री व आ. डॉ. पतंगराव कदम यांनी केला. शिक्षणासाठी कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध केला जात नाही, त्यामुळे काय ‘मेक इन’ होणार? शिक्षकांच्या हक्कांसाठी आता शिक्षकांनी मैदानात उतरले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक महामंडळाच्या बदलापूर येथे झालेल्या ५५ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात आ. डॉ. कदम बोलत होते. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी महादेव मातोंडकर होते. मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष अरुण थोरात, सचिव विजयकुमार गायकवाड, सुभाष माने, ज्ञानेश्वर म्हात्रे, स्वागताध्यक्ष वामन म्हात्रे, नंदकुमार सागर, कुंडलिक मेमाणे उपस्थित होते. मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष थोरात यांनी विद्यार्थ्यांच्या दप्तराकरिता मुख्याध्यापक व शिक्षकांवर टाकण्यात आलेल्या जबाबदारीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या सरकारी भूमिकेचा तीव्र निषेध केला.
यावेळी सुभाष माने म्हणाले की, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र करीत असताना मुख्याध्यापक व शिक्षकांना प्रचंड दबावाखाली काम करावे लागत आहे. त्यामुळे शिक्षकांनी आता आत्महत्या करावी का?
सरकारने आता नवीन सादर होणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निर्मितीत मुख्याध्यापक संघटनेला समाविष्ट करून न घेतल्यास या धोरणाविरोधात बहिष्कार टाकावा लागेल, असा इशारा मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव विजयकुमार गायकवाड यांनी दिला.
या अधिवेशनाचे संयोजन संदीपान मस्तुद, ज्ञानेश्वर म्हात्रे, जे. के. पाटील, प्रशांत रेडीज, प्रवीण पाटील यांनी केले होते. यावेळी मुख्याध्यापकांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव विजयकुमार गायकवाड यांनी आभार मानले. (वार्ताहर)
अठ्ठावीस ठराव मंजूर
४या मुख्याध्यापक अधिवेशनात संच मान्यता व प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र यावर शोधनिबंध सादर करण्यात आले. एकूण २८ ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
४शालेय पोषण आहारात चुकीच्या केलेल्या कारवाईने आत्महत्या करावी लागलेल्या विजय नकाशे या मुख्याध्यापकांना अधिवेशनात श्रध्दांजली वाहण्यात आली.