पालकमंत्र्यांच्या खेळीने जिल्हा परिषदेत भाजप सावध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:26 IST2021-04-06T04:26:02+5:302021-04-06T04:26:02+5:30
सांगली : खासदार संजयकाका पाटील यांनी जिल्हा परिषद पदाधिकारी बदल केला तर होऊ शकतो, असे विधान पालकमंत्री जयंत ...

पालकमंत्र्यांच्या खेळीने जिल्हा परिषदेत भाजप सावध
सांगली : खासदार संजयकाका पाटील यांनी जिल्हा परिषद पदाधिकारी बदल केला तर होऊ शकतो, असे विधान पालकमंत्री जयंत पाटील यांनी विटा येथे केल्यानंतर भाजप सावध झाली आहे. त्यामुळे पदाधिकारी बदल बारगळण्याची चर्चा रंगली आहे. बदलास नेते तयार नसल्यामुळे भाजपमधील इच्छुक नाराज आहेत.
जिल्हा परिषदेत विद्यमान पदाधिकाऱ्यांना बदलून नव्याने संधी द्यावी, या मागणीसाठी काही सदस्यांनी महिन्याभरापासून जोर लावला आहे. मात्र, काठावर बहुमत असलेल्या सत्ताधारी भाजपला बदल करणे सोपे नाही. स्पष्ट बहुमत असलेली महापालिकेची सत्ता भाजपने तेथील बदलावेळी गमावली आहे. त्यामुळे भाजप नेत्यांसमोर ताकही फुंकून पिण्याची वेळ आली आहे. असे असले तरी बदलासाठी इच्छुक असलेल्यांनी नेत्यांकडे मागणी लावून धरल्याने हा विषय संपलेला नाही. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमावर भाजपच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी बहिष्कार टाकला होता. जयंत पाटील यांनी महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेतही लवकरच जाणार असत्याचे वक्तव्य केले होते. त्यानतर भाजपा नेते सावध झाले होते.
जयंत पाटील यांच्याकडून जिल्हा परिषदेत ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी बदलाचा विषय तूर्त लांबवला होता. बदलाचा विषय बारगळणार अशी चर्चा सुरू असतानाच पालकमंत्री पाटील यांनी रविवारी पुन्हा विटा येथे पदाधिकारी बदलाच्या विषयावर वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे पदाधिकारी बदल होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट होत आहे. भाजपकडे काठावरचे बहुमत आहे. पाठिंबा दिलेल्या शिवसेना आणि घोरपडे गटाची भूमिका महत्त्वाची आहे. या गटांशी चर्चा केल्याशिवाय भाजपला बदलाचा निर्णय घेणे शक्य नाही.
चौकट
पदाधिकारी बदलाबाबत भाजपमध्ये मतभिन्नता
पदाधिकारी बदलासाठी खा. संजयकाका पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी लावून धरली आहे, पण भाजपच्या अन्य नेत्यांनी जयंत पाटील यांचा धसका घेतला आहे. यामुळे भाजपच्या त्या नेत्यांनी पदाधिकारी बदल नकोच, असे स्पष्ट चंद्रकांत पाटील यांना सांगितले आहे. बदलाबाबत भाजप नेत्यांमध्ये मतभिन्नता आहे. एक गट बदल करावा म्हणत आहे, तर दुसरा गट बदलाला विरोध करीत आहे.