स्थायी सभापती निवडीसाठी भाजप ‘ॲलर्ट मोड’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:31 IST2021-09-05T04:31:12+5:302021-09-05T04:31:12+5:30

सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडीला अद्याप तीन दिवस असले तरी राष्ट्रवादी व काँग्रेसकडून कोणताही दगाफटका नको म्हणून ...

BJP on 'alert mode' for election of permanent speaker | स्थायी सभापती निवडीसाठी भाजप ‘ॲलर्ट मोड’वर

स्थायी सभापती निवडीसाठी भाजप ‘ॲलर्ट मोड’वर

सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडीला अद्याप तीन दिवस असले तरी राष्ट्रवादी व काँग्रेसकडून कोणताही दगाफटका नको म्हणून भाजप ॲलर्ट मोडवर गेली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी व काँग्रेसनेही भाजपअंतर्गत नाराजीचा फायदा घेऊन निवडणूक लढविण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावल्याचे दिसून येत आहे.

स्थायी समितीच्या सभापती निवडीत नेहमीच नाट्यमय घडामोडी घडत असतात. सत्ता कोणाचीही असली तरी नाराजीचा फायदा उठविण्यासाठी विरोधी पक्ष सज्ज असतात. यापूर्वीही दुसऱ्या पक्षाचे संख्याबळ अधिक असतानाही अंतर्गत नाराजीचा फायदा उठवित राष्ट्रवादीच्या संगीता हारगे यांनी स्थायी सभापती पदाच्या शर्यतीत बाजी मारली होती. असाच प्रकार महापौर निवडीवेळीही झाला होता. त्यामुळे भाजप यावेळी अधिक सतर्क झाली आहे.

सदस्यांना त्यांनी हैद्राबादला नेले आहे. भाजपअंतर्गत सध्या इच्छुकांपैकी कोणालाही डावलले तर दगाफटका होईल याची भाजप नेत्यांना अधिक भीती आहे. महापौर, उपमहापौर निवडीवेळी थोडासा गाफिलपणा भाजपला अंगलट आला होता. संख्याबळ असूनही भाजपचे सात नगरसेवक काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गळाला लागले होते. स्थायी समिती सभापती निवडीलाही भाजप नेत्यांना हीच भीती सतावत आहे.

दुसरीकडे पुन्हा एकदा भाजपचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेस सरसावली आहे. दोन्ही पक्षात उमेदवारीवरून खल सुरू आहे. इच्छुकांपैकी कोणाला साथ द्यायची, याववरून राजकीय खेळ्या सुरू झाल्या आहेत.

स्थायी समितीत भाजपचे ९, काँग्रेसचे ४ तर राष्ट्रवादीचे ३ सदस्य आहेत. काँग्रेसला सभापतीपदाची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून करण जामदार, संतोष पाटील यांची नावे चर्चेत आहेत. भाजपमध्ये सुरेश आवटींनी त्यांच्या मुलासाठी म्हणजेच निरंजन आवटींच्या उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे. भाजपकडून निरंजन आवटीसह सविता मदने, संजय यमगर, जगन्नाथ ठोकळे यांची नावे चर्चेत आहेत. भाजपमध्ये उमेदवारीसाठी इच्छुक अनेक असल्याने नेत्यांना ऐनवेळी उमेदवार ठरविताना कसरत करावी लागणार आहे.

चौकट

इच्छुकांशी भाजप नेत्यांची चर्चा

भाजपच्या स्थानिक नेत्यांनी पक्षातील इच्छुकांशी शनिवारी चर्चा केली. कोणालाही उमेदवारी मिळाली तरी अन्य इच्छुकांनी पक्षाशी बांधिल रहावे, अशी सूचनाही दिली आहे. उमेदवारी ज्यांना नाकारली जाईल, त्यांना भविष्यात संधी देण्याची आश्वासनही देण्यात आले आहे.

चौकट

काँग्रेस, राष्ट्रवादीला आशा

काँग्रेस व राष्ट्रवादीतील इच्छुकांनाही पद मिळण्याची आशा आहे. नाराज गटातील दोन सदस्य फुटले तरी गणित जमण्यासारखे असल्याने त्यांनी आतापासून फिल्डिंग लावली आहे.

Web Title: BJP on 'alert mode' for election of permanent speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.