बर्ड फ्लूच्या भीतीने मुक्त केले पक्षी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:28 IST2021-01-19T04:28:27+5:302021-01-19T04:28:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : बर्ड फ्लूच्या भीतीने सांगलीतील अनेक घरांमध्ये पाळलेले विविध प्रकारचे पक्षी मुक्त करण्यात आले आहेत, ...

बर्ड फ्लूच्या भीतीने मुक्त केले पक्षी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : बर्ड फ्लूच्या भीतीने सांगलीतील अनेक घरांमध्ये पाळलेले विविध प्रकारचे पक्षी मुक्त करण्यात आले आहेत, मात्र अन्न मिळविण्याची नैसर्गिक पद्धत ते विसरल्यामुळे त्यांची उपासमार होऊ लागली आहे.
सांगलीत सामाजिक कार्यकर्ते मुस्तफा मुजावर यांना काही पक्षी अन्नासाठी धडपडताना दिसले. त्यांनी त्यांना अन्नपाणी देऊन सावली निवारा केंद्रात त्यांची व्यवस्था केली आहे. सांगलीत पक्षी पाळणारी शेकडो कुटुंबे असून पाळीव पक्ष्यांचे प्रजनन करून ते विकणारेही अनेक जण आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांत पाळीव पक्ष्यांची सांगली शहरातील व जिल्ह्यातील संख्या वाढली आहे. फेनटेल कबुतर, लव्ह बर्ड, फिंचेस, आफ्रिकन पॅराेट असे विविध प्रकारचे पक्षी पाळण्याकडे लोकांचा कल आहे.
बर्ड फ्लूच्या भीतीने सांगलीत गेल्या काही दिवसांपासून या पक्ष्यांना निराधार करण्यात आले आहे. दूरवर जाऊन हे पक्षी सोडले जात आहेत. त्यांना नैसर्गिकरीत्या अन्न मिळविता येत नसल्याने त्यांची उपासमार होत आहे. असेच काही पक्षी सामाजिक कार्यकर्ते मुजावर यांना दिसले. त्यांनी त्यांची उपासमार दूर करून त्यांना सावली निवारा केंद्रात आसरा दिला. त्यांनी आवाहन केल्यानंतर अनेकांनी पक्षी सोडण्याऐवजी त्यांच्याकडे सुपुर्द करण्यास सुरुवात केली आहे.
चौकट
प्रशासनाकडून दखल
जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी दखल घेत पक्ष्यांची विक्री करणाऱ्या केंद्रांवर निर्बंध आणले आहेत. आदेशात त्यांनी म्हटले आहे की, पाळीव प्राणी दुकान नियम २०१८ व श्वान प्रजनन विपणन नियम २०१७ अन्वये जिल्ह्यातील सर्व पेट शॉपव डॉग ब्रिडिंग सेंटर महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी केल्याशिवाय सुरु करु नयेत. जिल्ह्यात अद्याप अशी एकही नोंदणी झाली नसल्याची बाबही त्यांनी मांडली आहे.