दरवाढीविरोधात वीज बिलांची होळी

By Admin | Updated: February 27, 2015 23:17 IST2015-02-27T22:30:27+5:302015-02-27T23:17:46+5:30

सांगलीत आंदोलन : जनता दल आक्रमक

Bills of electricity bill against hike | दरवाढीविरोधात वीज बिलांची होळी

दरवाढीविरोधात वीज बिलांची होळी

सांगली : वीज गळती आणि महावितरण कंपनी तोट्यात असल्याचे कारण पुढे करून वीज ग्राहकांवर त्याचा बोजा टाकून त्यांची आर्थिक लूट महाविरतण कंपनीकडून सुरु आहे. या घटनेच्या निषेधार्थ जनता दलातर्फे आज (शुक्रवारी) सांगलीतील विश्रामबाग चौकात महावितरणच्या वीज बिलांची होळी करून शासनाचा निषेध केला.जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड्. के. डी. शिंदे, हमाल पंचायतीचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब मगदूम, माजी उपमहापौर मोहन जाधव, अ‍ॅड्. फैय्याज झारी, शशिकांत गायकवाड, कुमार पाटील, हातगोंडा गौंडाजे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. वीज ग्राहकांना जादा दराने वीज बिलांचे वितरण महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. या बिलांची होळी करण्यात आली. तसेच शासनाच्या निषेधाच्याही घोषणा देण्यात आल्या. महावितरण कंपनीने वीज दरवाढ मागे घेण्याचीही मागणी करण्यात आली. एवढ्यावर शासनाचे डोळे उघडले नाहीत, तर जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला.प्रा. शरद पाटील म्हणाले की, वीज पुरवठा बंद असतो. त्या काळात मीटर फिरत नाही. पण, वीज बिल येतेच. ग्राहकांकडून चक्क अंधाराचे वीज बिल वसूल केले जाते. वीज दरवाढ म्हणजे वीज वितरण कंपनीच्या गैर व अकार्यक्षम कारभाराची शिक्षा ग्राहकांना दिल्याचा प्रकार आहे. वीज गळतीकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असून त्याचा बोजा मात्र वीज दरवाढीच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहक आणि शेतकऱ्यांवर टाकण्यात येत आहे. ही अन्याय्य दरवाढ सरकारने मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडू. (प्रतिनिधी)

Web Title: Bills of electricity bill against hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.