मिरजेत कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By Admin | Updated: June 15, 2015 00:18 IST2015-06-15T00:17:17+5:302015-06-15T00:18:02+5:30

शिवसैनिकांची दगडफेक : अपघाताला कारणीभूत ठरल्याबद्दल आयलँड फोडला

A biker killed in a car accident | मिरजेत कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

मिरजेत कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

मिरज : मिरज येथे हिरा हॉटेल चौकात कारने ठोकरल्याने आकाश संदीप सातपुते (वय २२, रा. उदगाव वेस) हा मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. मराठा सेवा संघाने चौकात उभारलेल्या आयलँडमुळे अपघात झाल्याची तक्रार करीत मृताचे नातेवाईक व शिवसेना कार्यकर्त्यांनी आयलँडची तोडफोड केली. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
रविवारी सकाळी आठ वाजता दुचाकीवरून (एमएच १0, आरएस ४१७४) आकाश सातपुते हा बसस्थानकाकडून हिरा हॉटेल चौकाकडे जात होता. यावेळी आंबेडकर उद्यानाकडून चौकाकडे आलेल्या डॉ. संजय सूर्यवंशी यांच्या चारचाकीची (एमएच १0, एएन १७९८) त्याच्या दुचाकीला धडक बसली. दुचाकीवरून उडून खाली पडल्याने आकाश सातपुते जागीच ठार झाला. नागरिकांनी सातपुते यास उपचारासाठी तातडीने शासकीय रुग्णालयात नेले; पण त्यास मृत घोषित करण्यात आले.
आकाश सातपुते याचा बसस्थानकाजवळ भाजी विक्रीचा स्टॉल होता. रविवारी सकाळी साहित्य आणण्यास मार्केटमध्ये जात असताना हा अपघात झाला. दुपारी कृष्णा घाट स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर आकाशचे नातेवाईक, मित्र व शिवसेना कार्यकर्त्यांनी, हिरा हॉटेल चौकाच्या सुशोभीकरणासाठी उभारलेल्या आयलँडमुळेच आकाशचा अपघात झाल्याची तक्रार करीत आयलँडवरच हल्ला चढविला. हातोडी, कुदळ घेऊन आलेल्या जमावाने नवीन बांधलेले आयलँड उद्ध्वस्त केले. सुमारे अर्धा तास जमावाची तोडफोड सुरू होती. रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या बसेसवरही जमावाने दगडफेक करून वाहतूक बंद पाडली. घटनेचे छायाचित्रण करणाऱ्या छायाचित्रकारांना पिटाळून लावण्यात आले. पोलीस आल्यानंतर जमाव पांगला. आयलँडची मोडतोड केल्याचे वृत्त समजताच मराठा सेवा संघाचे कार्यकर्तेही चौकात एकत्रित झाले. सेवा संघाचे शहराध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी आयलँड उद्ध्वस्त केल्याबद्दल शिवसेना तालुकाप्रमुख चंद्रकांत मैंगुरे, प्रशांत मोरे, सोमनाथ माणकापुरे, शंकर परदेसी, जुबेर शेख, राजू माळी, मोहन गायकवाड, संदीप शिंदे, पोपट सातपुते, उमेश जामदाडे, पंकज मोरे, राजू शेवकारे यांच्यासह १० ते १५ जणांविरुद्ध पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्याविरुद्ध सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश सातपुते याच्या मृत्यूप्रकरणी डॉ. संजय सूर्यवंशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, चौकात असलेला पोलिसांचा सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याने संशयित आरोपींचा शोध सुरूअसल्याचे पोलिसांनी सांगितले. तोडफोड व दगडफेकीच्या घटनेनंतर हिरा हॉटेल चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (वार्ताहर)

 

Web Title: A biker killed in a car accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.