इस्लामपुरात रस्त्यावरील बाजाराची मोठी समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:27 IST2021-02-11T04:27:54+5:302021-02-11T04:27:54+5:30
इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील रस्त्यावर भरणाऱ्या भाजी मंडईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोरोनानंतरच्या लॉकडाऊनच्या काळात मुख्य बाजार मार्ग बंद ...

इस्लामपुरात रस्त्यावरील बाजाराची मोठी समस्या
इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील रस्त्यावर भरणाऱ्या भाजी मंडईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोरोनानंतरच्या लॉकडाऊनच्या काळात मुख्य बाजार मार्ग बंद राहिल्याने भाजी आणि फळे विक्रीचा सर्व व्यवसाय रस्त्यावर आला होता. शहराच्या एकूण वाढीच्या तुलनेत बंदिस्त भाजी मंडईची कमतरता असल्याने तसेच शहराच्या लगतच्या गावांतून शेतकरी आणि व्यापाऱ्यांची मोठी गर्दी होऊ लागल्याने हा बाजार नेहमीच रस्ता ओसंडून वाहत असतो.
इस्लामपूर शहरात गुरुवार आणि रविवार असे दोन दिवस आठवडा बाजार भरतो, तर गणेश मंडईमध्ये दैनंदिन सकाळी मंडई भरत असते. तसेच मुख्य बाजारात दिवसभर मंडई भरलेली असते. गुरुवारी आणि रविवारी या आठवडा बाजारादिवशी संपूर्ण व्यवस्था कोलमडून पडलेली असते. रस्त्याकडेला बसलेले भाजी विक्रेते, भाजी खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची या परिसरात तोबा गर्दी उसळलेली असते. त्यातूनच दुचाकी, चारचाकी वाहनांची रेलचेल असते.
अस्वच्छ असणाऱ्या रस्त्यावर भरणारा बाजार, वाहनांच्या सततच्या गर्दीमुळे उडणारा धुरळा आणि इंधनासह हवेचे होणारे प्रदूषण हे या रस्त्यावर ठेवलेल्या भाजीपाल्यांवर लीलया जाऊन बसते. मात्र आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अपायकारक असतानाही ग्राहकांना रस्त्यावरची भाजी, फळे खरेदी करण्यासाठी पर्याय उरत नाही. पालिका प्रशासनाला या रस्त्यावरच्या भाजी मंडईची व्यवस्था लावण्याचे नियोजन करणे अशक्य होऊन बसले आहे.
आठवडा बाजारादिवशी रस्त्यावरच भरणाऱ्या भाजी मंडईमुळे वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच ठरलेली असते. वाहतूक शाखेचे पोलीस फक्त अवजड आणि हलक्या चारचाकी वाहनांचा प्रवेश रोखू शकतात. दुचाकी वाहनधारक मात्र या गर्दीतूनच आपली रपेट करत असतात. तीच अवस्था दररोज भरणाऱ्या गणेश मंडई परिसरात असते. अरुंद रस्ते आणि वाहनांचे ताफे व नागरिकांची गर्दी ही या परिसरात अनेक वेळा धोकादायक बनते. या सर्व परिस्थितीत शहरातील रस्त्यावरील भाजी बाजाराला शिस्त लावण्यासाठी एका प्रशस्त आणि मोठ्या भाजी बाजाराची गरज भासत आहे.
फोटो- १००२२०२१-आयएसएलएम-१, २, ३, व ४