तासगाव, डोंगराई कारखाना विक्रीत मोठा आर्थिक घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:18 IST2021-07-08T04:18:02+5:302021-07-08T04:18:02+5:30
सांगली : भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी घेतलेला तासगाव आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी डोंगराई हे सहकारातील कारखाने ...

तासगाव, डोंगराई कारखाना विक्रीत मोठा आर्थिक घोटाळा
सांगली : भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी घेतलेला तासगाव आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी डोंगराई हे सहकारातील कारखाने कवडीमोल दराने खरेदी केले आहेत. सभासदांना वाऱ्यावर सोडून कारखाने खरेदी केल्याची माहिती (सक्त वसुली संचनालय) ईडीपर्यंत कशी गेली नाही, अशी खोचक टीका स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली आहे. ते म्हणाले की, राज्यात प्रथम जरंडेश्वर कारखान्यावर कारवाई केली. यामुळे राज्यभरातील कारखाना विक्रीमधील आर्थिक घोटाळे उघडकीस आले. राज्यातील ४२ कारखान्यांच्या विक्रीची चौकशी होणार आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील यशवंत शुगर, नागेवाडी (ता. खानापूर), नीनाई देवी - कोकरूड (ता. शिराळा) आणि विजयसिंह डफळे, जत यांचा समावेश आहे. मात्र, तासगाव सहकारी साखर कारखाना अवघ्या ३४ कोटीला भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी विकत घेतला आहे. त्याचा यामध्ये समावेश नाही. २७ हजार सभासदांचा तासगाव कारखाना असून, दीडशे एकर कारखान्याच्या मालकीची जमीन, मशिनरी याची विक्री केवळ ३४ कोटीला केली. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक आणि राज्य सहकारी बँकेने मिळून हा घोटाळा करून सभासद, कामगार आणि शेतकऱ्यांच्या पैशांवर दरोडा टाकला आहे. हा घोटाळा ईडीला कधी दिसणार, असा प्रश्नही त्यांनी केला आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी तासगाव कारखान्याबाबत मुंबई येथील ईडी कार्यालयात जाऊन तक्रार दिली आहे. डोंगराई कारखानाही फुकटात भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी घेतला आहे. ते सध्या केन ॲग्रो नावे तो खासगीत चालवत आहेत. या कारखान्यांचीही ईडीकडून चौकशी होऊन दोन्ही कारखाने सभासदांचेच राहिले पाहिजेत, अशी मागणीही खराडे यांनी केली आहे.