‘बीडीओं’च्या जीपने केली ४0 लाखांची वसुली
By Admin | Updated: March 26, 2015 00:02 IST2015-03-25T23:18:05+5:302015-03-26T00:02:47+5:30
आटपाडीत विशेष मोहीम : शासकीय वाहन वसुलीसाठी देऊन देशमुखांची दुचाकीवरून तालुक्यात रपेट

‘बीडीओं’च्या जीपने केली ४0 लाखांची वसुली
अविनाश बाड - आटपाडी -मार्च एन्डमुळे बँकांची वसुली पथके कर्जदारांच्या दारात जप्ती आणि वसुलीसाठी धावाधाव करत असताना, आटपाडी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांची ध्वनिक्षेपक लावलेली जीप घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या वसुलीसाठी नागरिकांच्या दारातून फिरू लागली आहे. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवकांच्या या वसुली मोहिमेला चांगलेच यश मिळू लागले आहे. एका बाजूला जीपविना गटविकास अधिकारी मधुकर देशमुख दुचाकीवरुन फिरत असताना, त्यांच्या शासकीय जीपने मात्र गेल्या चार दिवसांत तब्बल ३८ लाख ९७ हजार रुपये एवढी विक्रमी वसुली केली आहे.
पंचायत समितीच्यावतीने विस्तार अधिकारी पी. ए. शिंदे आणि के. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी खास मोहीम सुरु केली आहे. छोट्या गावातील ५ ते १0 ग्रामसेवकांचे पथक आणि गटविकास अधिकारी मधुकर देशमुख यांची जीप घेऊन काही गावात वाजंत्र्यांसह नागरिकांच्या घरासमोर उभे राहून कर भरण्यासाठी आवाहन करत आहेत.
सायंकाळी सहा ते रात्री दहापर्यंत सर्व ग्रामस्थ हमखास घरी सापडतील अशा कालावधित वसुली केली जात आहे. गोमेवाडी गावात वाजंत्र्यांसह पथकाने घरोघरी जाऊन वसुली केली. कर दिला नाही तर पाण्याचे कनेक्शन तोडण्याचा इशारा दिला जात आहे. प्रत्येक कुटुंबियांना त्यासाठी तास-दोन तासांची मुदत दिली जाते. कारवाईच्या भीतीने लोक पैसे भरत आहेत.
याउलट काही गावात या विशेष पथकाला लोकांच्या विविध समस्यांमुळे संतापालाही सामोरे जावे लागत आहे. काहीजण या कारवाईविरुध्द तक्रारी करण्याचा इशाराही देत आहेत. या कारवाईचे संपूर्ण छायाचित्रण करण्यात येत आहे. जीपवर दोन छोटे ध्वनिक्षेपक बसविण्यात आले आहेत. आटपाडी पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच अशी वसुली मोहीम राबविण्यात आली.
मोहिमेत ग्रामसेवक डी. बी. देशमुख, एम. आर. माने, आर. एम. कोळी, सी. डी. कर्णे, एस. एस. ढोले, एस. एन. आदाटे, एस. यू. जाधव, एम. आर. कांबळे, डी. के. मोरे, एस. जी. देशमुख यांचा समावेश आहे.
वाजंत्र्यांना लाजले आणि पटापट पैसे भरले!
गोमेवाडीसह काही गावात जेव्हा वसुलीपथक वाजंत्री घेऊन नागरिकांच्या दारात जात असल्याचे परगावी असलेल्या तालुकावासीयांना कळाले, तेव्हा त्यांनी तात्काळ संपर्क साधून पैसे भरले. छोट्या गावात या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता मोठ्या गावात प्रभागनिहाय वसुली मोहीम आखली आहे. सध्या आटपाडी या तालुक्याच्या मुख्य गावाची थकबाकी सर्वाधिक आहे. त्यामुळे आटपाडी ग्रामपंचायतीचे ‘बजेट’ कोलमडले आहे.
या विशेष मोहिमेमुळे लहान गावांची ९० टक्के वसुली झाली आहे. तालुक्यातील मोठ्या गावांतील ग्रामस्थांनीही घरपट्टी, पाणीपट्टी भरून प्रशासनाला सहकार्य करावे. आता ही मोहीम मोठ्या गावात राबवून एकूण ९० टक्के वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करणार आहे.
- मधुकर देशमुख, गटविकास अधिकारी
घरपट्टी-पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट : २ कोटी २८ लाख
एकूण गावे : ६०
एकूण ग्रामपंचायती : ५६
दोन हजारावरील लोकसंख्येची गावे : १७
दोन हजार लोकसंख्येच्या आतील गावे : ३९
एकूण कुटुंबे : २८,१२१