पालकमंत्र्यांआधीच चिल्ड्रन पार्कचे भाजपकडून भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:32 IST2021-08-17T04:32:30+5:302021-08-17T04:32:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : नेमीनाथनगर येथील नियोजित चिल्ड्रन पार्कच्या भूमिपूजनावर राष्ट्रवादी व भाजपमध्ये रविवारी वाद रंगला. पालकमंत्री जयंत ...

Bhumi Pujan of Children's Park by BJP even before the Guardian Minister | पालकमंत्र्यांआधीच चिल्ड्रन पार्कचे भाजपकडून भूमिपूजन

पालकमंत्र्यांआधीच चिल्ड्रन पार्कचे भाजपकडून भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : नेमीनाथनगर येथील नियोजित चिल्ड्रन पार्कच्या भूमिपूजनावर राष्ट्रवादी व भाजपमध्ये रविवारी वाद रंगला. पालकमंत्री जयंत पाटील यांच्याआधीच भाजपने भूमिपूजन करीत राष्ट्रवादीला धक्का दिला. यावेळी पोलीस व भाजप नगरसेवक, पदाधिकाऱ्यांत बाचाबाचीही झाली.

प्रभाग १७ मधील वाडीकर मंगल कार्यालयाजवळील महापालिकेच्या खुल्या जागेत चिल्ड्रन पार्क उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार होते; पण या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण समिती सभापती गीतांजली ढोपे पाटील यांच्यासह भाजप नेते, नगरसेवकांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. हे काम महिला व बालकल्याण समितीच्या निधीतून मंजूर झाले होते. हा प्रभाग विद्यमान महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांचाही आहे. त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण न देताच भूमिपूजनाचा घाट घातला होता. त्याला भाजपने विरोध करीत कार्यक्रम हाणून पाडण्याचा इशारा दिला होता.

रविवारी सकाळी भाजपचे गटनेते विनायक सिंहासने, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, नगरसेविका ढोपे-पाटील, स्वाती शिंदे, लक्ष्मण नवलाई, भारती दिगडे, कल्पना कोळेकर, दीपक माने आदींनी कार्यक्रमस्थळ गाठले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात होता. पोलिसांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यातून बाचाबाची झाली. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, शहर अभियंता संजय देसाई यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजपने आयुक्तांना जाब विचारला असता त्यांनी हा प्रशासनाचा कार्यक्रम नसल्याचे सांगितले. त्यानंतर भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले. पालकमंत्री येण्याआधीच भाजपचे ढोपे-पाटील, नवलाई यांनी रेड कार्पेटवर नारळ फोडून भूमिपूजन झाल्याची घोषणा केली. भाजपचे कार्यकर्ते भूमिपूजन करून निघून गेल्यानंतर पालकमंत्री पाटील हे महापौर, अधिकाऱ्यांसह तिथे आले. त्यांच्या हस्तेही नारळ फोडण्यात आला.

चौकट

महापौरांचा निषेध

गीताजंली ढोपे-पाटील म्हणाल्या की, चिल्ड्रन पार्कच्या प्रस्तावाशी राष्ट्रवादी व महापौरांचा काडीमात्र संबंध नाही. महिला व बालकल्याण समितीतून पाठपुरावा करून या कामासाठी निधी मंजूर केला होता. पालकमंत्री व नगरसेवकांनाही महापौरांनी अंधारात ठेवले. या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले नाही. त्याचा आम्ही निषेध करतो. यापुढे महापौरांनी असा प्रकार केल्यास त्याला जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा दिला.

चौकट

आयोजन कुणाचे?

गटनेते विनायक सिंहासने म्हणाले की, चिल्ड्रन पार्कच्या भूमिपूजनाबाबत महापौरांकडे विचारणा केली असता त्यांनी हा कार्यक्रम प्रशासनाने घेतल्याचे सांगितले, तर आयुक्त कापडणीस मात्र भूमिपूजनाचा प्रशासनाशी संबंध नसल्याचे सांगतात. मग नेमके आयोजन कुणी केले होते, असा सवाल केला.

Web Title: Bhumi Pujan of Children's Park by BJP even before the Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.