महापालिकेत बी.एच.एम.एस. डाॅक्टर नियुक्त होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:27 IST2021-04-01T04:27:42+5:302021-04-01T04:27:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेच्या आरोग्य विभागामध्ये करार पद्धतीने आयुष वैद्यकीय अधिकारी म्हणून बी.एच.एम.एस. डॉक्टरांची निवड केली जाईल, ...

महापालिकेत बी.एच.एम.एस. डाॅक्टर नियुक्त होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेच्या आरोग्य विभागामध्ये करार पद्धतीने आयुष वैद्यकीय अधिकारी म्हणून बी.एच.एम.एस. डॉक्टरांची निवड केली जाईल, असे आश्वासन आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिले. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आयुक्तांची भेट घेऊन या डॉक्टरांची नियुक्ती करण्याची मागणी केली.
पृथ्वीराज पाटील यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर मिरज येथे महापालिकेच्यावतीने कोविड केअर सेंटर सुरू होणार आहे. याठिकाणी बी.ए.एम.एस. डॉक्टरांचा आयुषमार्फत समावेश केल्याचे समजते. आयुषमध्ये आयुर्वेद, होमिओपॅथी, योग, सिद्ध या सर्वांचा समावेश होतो. सप्टेंबर २०२० मध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाची करार पद्धतीने जागा भरण्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली होती. त्यामध्ये बी.एच.एम.एस.चा उल्लेख केलेला नव्हता. फक्त बी.ए.एम.एस. डॉक्टरांचा उल्लेख केला होता. बृहन्मुंबई, नवी मुंबई, पनवेल आणि इतर महापालिकांनी बी.एच.एम.एस. डॉक्टरांना सामावून घेतलेले आहे.
गेल्यावर्षी महापालिकेच्या आदिसागर हेल्थ सेंटरमध्ये अनेक बी.एच.एम.एस. डॉक्टरांनी सेवा बजावली होती. या सर्व गोष्टींचा विचार करून कंत्राटी आरोग्य भरतीत बी.एच.एम.एस. डॉक्टरांचा समावेश करावा.
यावर आयुक्त म्हणाले की, बी.एच.एम.एस. डॉक्टरांचा महापालिका आरोग्य विभागामध्ये समावेश करण्यात येईल. यावेळी होमिओपॅथिक इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अभय देसाई, उपाध्यक्ष डॉ. अपेक्षा महाबळेश्वरकर, सेक्रेटरी डॉ. फिरोज तांबोळी आदी उपस्थित होते.