भीमसेन जोशींच्या तीन पिढ्यांची सेवा

By Admin | Updated: June 2, 2014 01:18 IST2014-06-02T01:06:41+5:302014-06-02T01:18:50+5:30

मिरजेत गायन : अब्दुल करीम खाँ संगीत सभा

Bhimsen Joshi's three generations service | भीमसेन जोशींच्या तीन पिढ्यांची सेवा

भीमसेन जोशींच्या तीन पिढ्यांची सेवा

 मिरज : किराना घराण्यातील प्रसिध्द गायक पंडित भीमसने जोशी यांचे नातू विराज जोशी यांनी मिरजेतील अब्दुल करीम खाँ स्मृती संगीत सभेत गायन सेवा अर्पण केली. यापूवी पंडित भीमसेन जोशी, त्यांच्या पत्नी, चिरंजीव श्रीनिवास यांनी मिरजेतील संगीत सभेत गायन केले आहे. विराज याच्यामुळे त्यांच्या तिसर्‍या पिढीचेही मिरजेतील संगीत सभेत गायन झाले. किराना घराण्याचे अध्वर्यु संगीतरत्न अब्दुल करीम खाँ यांची कर्मभूमी असलेल्या मिरजेस मोठी संगीत परंपरा आहे. संगीतरत्न अब्दुल करीम खाँ यांचे जगभरातील शिष्य त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त दर्गा उरूसात होणार्‍या संगीत सभेत आपली संगीत सेवा अर्पण करतात. मागील ८० वर्षांपासून संगीत सभेची अखंड परंपरा सुरू आहे. अब्दुल करीम खाँ साहेब दर्गा परिसरातील ज्या चिंचेच्या झाडाखाली गायन करायचे, तेथे उरूसाच्या पहिल्यादिवशी किराणा घराण्यातील शिष्याच्या गायन व वादनाने संगीत सभेस सुरुवात होते. सुप्रसिध्द गायक पंडित भीमसेन जोशी यांचे मिरजेच्या संगीत परंपरेशी ऋणानुबंध होते. पंडित भीमसेन जोशी यांचे गुरू अब्दुल करीम खाँ यांच्या स्मृतिनिमित्त आयोजित संगीत सभेस ते आवर्जून उपस्थित राहात. दर्गा संगीत सभेत पंडित भीमसेन जोशी, त्यांच्या पत्नी व चिरंजीव श्रीनिवास यांचेही गायन झाले आहे. आता भीमसेन जोशी यांचे नातू विराज यांनी संगीत सभेत आपली गायन सेवा सादर करून श्रोत्यांची दाद मिळविली. संगीत सभेच्या समारोप सत्रात रमाकांत राऊत यांच्या तबला व संदीप गुरव यांच्या संवादिनीच्या साथीने त्यांनी राग यमन व पंडित भीमसेन जोशींचा हिंदी अभंग गायला. सुमारे अर्धा तास विराज यांचे गायन झाले. पंडित भीमसेन जोशींच्या तिसर्‍या पिढीच्या गायन कलेची सुरुवात मिरजेतून झाली. श्रीनिवास व विराज यांनी संगीतरत्न अब्दुल करीम खाँ यांच्या समाधीचेही दर्शन घेतले. पंडित भीमसेन जोशींच्या तिसर्‍या पिढीच्या उपस्थितीमुळे मिरजेतील यावर्षीच्या संगीत सभेस यावेळी वेगळे महत्त्व प्राप्त झाले होते. यासाठी गर्दीही झाली होती. (वार्ताहर)

Web Title: Bhimsen Joshi's three generations service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.