सांगलीमध्ये रविवारी भीमसेन जोशी महोत्सव
By Admin | Updated: January 2, 2015 00:20 IST2015-01-01T23:20:26+5:302015-01-02T00:20:11+5:30
नामवंत कलाकरांचा सहभाग : रसिकांना संधी

सांगलीमध्ये रविवारी भीमसेन जोशी महोत्सव
सांगली : शास्त्रीय संगीताचे रसिक कार्यकर्ते बाळासाहेब कुलकर्णी आणि देश-विदेशात अनेक नामवंत संगीत कलाकारांना हार्मोनियमवर संगीतसाथ करणारे त्यांचे चिरंजीव मिलिंद कुलकर्णी यांनी सांगलीमध्ये रविवार, दि. ४ जानेवारी रोजी स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचे विनामूल्य आयोजन केले आहे. जपानचे संतूरवादक ताकाहिरो अराई व अनेक नामवंत कलाकार या महोत्सवात सहभागी होणार आहेत. हा सोहळा येथील भावे नाट्यमंदिरात होणार आहे.
सकाळी ८.३० वा. संगीत महोत्सवाचे उद्घाटन गुरुनाथ कोटणीस महाराज, चंद्रशेखर केळकर, झेंडे महाराज (म्हैसाळ) यांच्याहस्ते, खा. संजयकाका पाटील, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
पहिल्या सत्राचा प्रारंभ सकाळी ८.३० वा. पंडित ऋषिकेश बोडस (मिरज) यांच्या गायनाने तसेच भक्तिसंगीताने होणार आहे. त्यानंतर उस्ताद रईस खान (धारवाड) व हाफीजखान यांच्यात सतारवादनाची जुगलबंदी होणार आहे. त्यानंतर ज्येष्ठ गायक पंडित उपेंद्र भट (पुणे) यांचे गायन व भक्तिसंगीत श्रोत्यांना अनुभवता येणार आहे. दुपारी ३.३० वाजता सुरू होणाऱ्या दुसऱ्या सत्रात मंगला जोशी यांचे गायन व भक्तिसंगीत, पंडित शिवकुमार शर्मा यांचे शिष्य ताकाहिरो अराई यांचे संतूरवादन, सायली पानस (पुणे) यांचे गायन व भक्तिसंगीत, पंडित रामदास पळसुले (पुणे) यांचे सोलो तबला वादन होणार आहे. तबलासाथ नीलेश रणदिवे (पुणे), महेश देसाई (कोल्हापूर), हार्मोनियमसाथ अण्णासाहेब बुगड (इचलकरंजी) व मिलिंद कुलकर्णी (पुणे),पखवाजसाथ ज्ञानेश्वर दुधाणे (पंढरपूर) व नितीन घोडके करणार आहेत. (प्रतिनिधी)