भिडे यांचे विधान तपासून कारवाई करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:24 IST2021-04-12T04:24:36+5:302021-04-12T04:24:36+5:30
सांगली : आंबा खाल्ल्याने मुले होतात असे विधान करणाऱ्या संभाजीराव भिडे यांच्याविषयी काय बाेलणार परंतु कोरोनाविषयक त्यांनी केलेले वक्तव्य ...

भिडे यांचे विधान तपासून कारवाई करणार
सांगली : आंबा खाल्ल्याने मुले होतात असे विधान करणाऱ्या संभाजीराव भिडे यांच्याविषयी काय बाेलणार परंतु कोरोनाविषयक त्यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. समाजातील प्रत्येक घटक व राज्य सरकार कोरोना संकट टाळण्यासाठी प्रयत्न करताना असताना असे बोलणे बाधा आणणारे असून त्या विधानाची तपासणी करून भिडे यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केले.
शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना कोरोना हा आजार नसून मानसिक रोग आहे. कोरोनाने मेलेल्या व्यक्ती जगण्याच्या लायकीच्या नव्हत्या, असे विधान केले होते. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून प्रत्येकजण कोरोनाविषयक खबरदारीच्या सूचना देत आहेत, तर आरएसएसचे सरसंघचालक, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांना कोरोना झाला आहे. त्यावेळी कोरोनाविषयी असा शब्द ते वापरणार आहेत का? तरीही भिडे यांच्याकडून अशाप्रकारे विधान निषेधार्हच आहे.
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने समाज आणि राज्य सरकारकडून कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी हाेत असलेल्या प्रयत्नांना बाधा आणणारे त्यांचे वक्तव्य आहे. आंबा खाल्ल्याने मुले होतात असे बोलणाऱ्यांबाबत आपण काय बोलायचे? पण कोरोनाविषयक त्यांचे विधान चुकीचे आहे.
अशा स्वरूपाचे बोलून कोरोना संकट टाळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या राज्य सरकारच्या प्रयत्नांना बाधा आणत आहे. त्यामुळे संभाजीराव भिडे यांच्या विधानाची योग्य ती यंत्रणा तपासणी करून मगच कारवाई करण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.