भरधाव टेम्पाेने दाेन बालकांना ठाेकरले; एक जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:28 IST2021-04-27T04:28:09+5:302021-04-27T04:28:09+5:30
एसएएन २ : अपघातानंतर संतप्त नागरिकांनी टेम्पोच्या काचा फोडल्या. मिरज : मिरजेत महात्मा फुले चौकात टेम्पोने ठोकरल्याने आर्यन ...

भरधाव टेम्पाेने दाेन बालकांना ठाेकरले; एक जागीच ठार
एसएएन २ : अपघातानंतर संतप्त नागरिकांनी टेम्पोच्या काचा फोडल्या.
मिरज : मिरजेत महात्मा फुले चौकात टेम्पोने ठोकरल्याने आर्यन कुंचीकोरवी हा आठ वर्षाचा बालक जागीच ठार झाला, तर सात वर्षाचा रोहित तायाप्पा शिंदे हा बालक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी टेम्पोच्या काचा फोडल्या. साेमवारी सायंकाळी पाच वाजता ही घटना घडली.
महात्मा फुले चौकातून पुढे कोल्हापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान आर्यन कुंचीकाेरवी व राेहित शिंदे हे दुकानातून खाऊ घेऊन रस्ता ओलांडत हाेते. यावेळी कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पाेने (क्र. एमएच २० बीटी १८११) त्यांना समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात आर्यन कुंचीकोरवी हा जागीच ठार झाला, तर त्याच्यासाेबत असलेला रोहित हा गंभीर जखमी झाला. अपघातात बालकाच्या मृत्यूमुळे संतप्त नागरिकांनी टेम्पोच्या काचा फोडल्या. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले.
या घटनेमुळे परिसरात गर्दी जमली होती. गांधी चौक पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून मृत बालकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. जखमी रोहित शिंदे यास उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.