फेसबुकवरून पैशाची मागणी झाली तर सावधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:26 IST2021-05-19T04:26:06+5:302021-05-19T04:26:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाकाळात सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. त्यातही फेसबुकवरून मित्र, मैत्रिणी, नातेवाइकांचे बनावट अकाऊंट काढून ...

फेसबुकवरून पैशाची मागणी झाली तर सावधान
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाकाळात सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. त्यातही फेसबुकवरून मित्र, मैत्रिणी, नातेवाइकांचे बनावट अकाऊंट काढून पैशाची मागणी होत असल्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. त्यामुळे एखाद्या मित्राकडून फेसबुकवरून पैशाची मागणी झाली तर खात्री केल्याशिवाय पैसे पाठवू नका, असे आवाहन सायबर पोलिसांकडून केले जात आहे.
सध्याच्या युगात अँड्राॅइड मोबाइलचा वापर वाढला आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा अनेक सोशल मीडियाचा वापरही मोठ्या प्रमाणात होत आहे. यापूर्वी मोबाइलवर संपर्क साधून एटीएम, क्रेडिट कार्डचा ओटीपी घेऊन लाखो रुपयांच्या फसवणुकीचे प्रकार होत होते. आजही असे प्रकार सुरू आहेत. त्यात आता फसवणूक करणाऱ्यांनी नवीन फंडा अवलंबला आहे. फेसबुकवरून एखाद्या व्यक्तीचे अकाउंट हॅक करून फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली जाते. ही रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर आपल्याकडे पैशाची मागणी करणारा मेसेज येतो. आपणही कशाची खात्री न करता मित्र, मैत्रीण, नातेवाईक अडचणीत असेल म्हणून पैसे पाठवून देतो. यातून मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत. फेसबुकवरून दोन हजारांपासून ते २० हजारांपर्यंतची मागणी केली जाते. बहुतांश वेळा दोन ते पाच हजारांपर्यंतची रक्कम असल्याने आपणही पैसे देऊन मोकळे होतो. संबंधित मित्राकडे चौकशी केल्यानंतर फसवणूक झाल्याचे स्पष्ट होते. बनावट खाते उघडून पैशाची फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहिले पाहिजे.
चौकट
परिचयातील व्यक्तीच्या नावाचाच वापर
१. फेसबुकवर ओळखीच्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली जाते. वास्तविक हा मित्र पूर्वीही आपला फ्रेंड असूनही आपण ती रिक्वेस्ट स्वीकारतो. काही वेळेनंतर पैशाच्या मागणीचा मेसेज येतो. फसवणूक करणाऱ्यांकडून हे अकाउंट हॅक केलेले असते.
२. सध्या कोरोनाकाळात मेडिकल, दवाखाना, औषधाच्या नावाखाली पैशाची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे.
३. माझ्याकडून मित्राला पैसे फाॅरवर्ड होत नाही. तू पैसे फाॅरवर्ड कर, मी अर्ध्या तासात देतो, असेही मेसेज पाठविले जातात.
चौकट
अशी घ्या काळजी
ज्या मित्राकडून नव्याने फ्रेंड रिक्वेस्ट आली आहे, त्याची स्वत: खात्री करावी. संबंधित मित्राला प्रसंगी फोन करावा. अकाउंट हॅक झाल्याची खात्री झाल्यानंतर ही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये, तसेच मित्राला फेसबुककडे फेक अकाउंटबाबत तक्रार करण्याची सूचना करावी.
चौकट
कोट
सायबर पोलिसांकडे पैशाच्या फसवणुकीच्या तक्रारी येत असतात. यापूर्वी मोबाइलवरील ओटीपी घेऊन फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. आता फेसबुकवरून पैशांची मागणी होत असल्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे खात्री केल्याशिवाय कुणालाही पैसे पाठवू नयेत. फसवणूक झाल्यानंतर सायबर पोलिसांशी संपर्क करावा.
- संजय क्षीरसागर, सायबर गुन्हे विभाग प्रमुख.