फेसबुकवर अनोळखी सुंदरीने चॅटिंग केल्यास सावधान ! ‘हनी ट्रॅप’ वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:18 IST2021-06-11T04:18:09+5:302021-06-11T04:18:09+5:30
सांगली : कट्ट्यांवरील गप्पा आणि मित्रांच्या घोळक्यापेक्षा फेसबुकवरील ‘फ्रेंड लिस्ट’ किती मोठी यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. मात्र हीच आभासी ...

फेसबुकवर अनोळखी सुंदरीने चॅटिंग केल्यास सावधान ! ‘हनी ट्रॅप’ वाढले
सांगली : कट्ट्यांवरील गप्पा आणि मित्रांच्या घोळक्यापेक्षा फेसबुकवरील ‘फ्रेंड लिस्ट’ किती मोठी यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. मात्र हीच आभासी जगातील मैत्री तुमच्याही नकळत तुम्हाला अडचणीतही आणू शकते. फेसबुकवर झालेल्या अनोळखी मैत्रीतून सुरुवातीला बोलणे आणि त्यानंतरच्या चॅटिंगमुळे ‘हनी ट्रॅप’चे प्रकार वाढत असून, अनोळखी सुंदरीने फेसबुकवर तुमच्याशी केलेला संवाद त्रासदायक ठरत आहे.
फेसबुकवर आलेल्या अनोळखी मैत्रीची विनंती स्वीकारल्यानंतर बोलणे सुरू होते आणि त्यातून अनेक जणांची फसगत झाली आहे. सध्या राज्यातील अनेक भागात अशी प्रकरणे समोर आली आहेत. जिल्ह्यात आटपाडी परिसरातही गेल्या आठवड्यात हा प्रकार समोर आला आहे. अनेक तरुण एक सुंदर तरुणी बोलतेय म्हणून त्यात गुंतत जातात व त्यामुळे पुढे मोठी फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एखाद्या अनोळखी तरुणीने संदेश पाठविल्यास त्यात जास्त न गुंतता व आपली कोणतही माहिती न देता अधिक सर्तक राहणे आवश्यक बनले आहे.
चौकट
ही घ्या उदाहरणे
फेसबुकवरील मैत्रिणीने घातला गंडा
जिल्ह्यातील एका डॉक्टराला फेसबुकवर ओळख झालेल्या मैत्रिणीने चांगला ७ लाखांना गंडा घातला. ती भारतात आली असल्याचे तिने सांगत तिच्याकडील चलन चालत नसल्याचे सांगत डॉक्टरकडून पैसे मागून घेत फसवणूक केली. उच्चशिक्षित डॉक्टरलाही यामुळे मनस्ताप सहन करावा लागला होता.
चौकट
गलाई व्यावसायिकाला टाकली भुरळ
जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील एका तरुण गलाई व्यावसायिकालाही अनोळखी तरुणीशी मैत्री करणे महागात पडले. त्या तरुणीने फेसबुकवर ओळख करत मोबाइल नंबर मिळवत त्याला व्हिडिओ कॉल करत भुरळ पाडली, पण फसवणूक हाेत असल्याचे त्याच्या लक्षात येताच त्याने संपर्क बंद करून टाकला.
चौकट
फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर वैयक्तिक नंबर मागायचा. सुरुवातीचे काही दिवस छान छान बोलून झाल्यानंतर सावज आपल्या जाळ्यात आले आहे याची जाणीव होताच व्हिडिओ कॉल करून अगदी आक्षेपार्ह स्थितीतील कॉल रेकॉर्ड करून बदनामी करण्याची धमकी देत पैसे उकळण्याचे प्रकार घडले आहेत. दुर्दैवाने बदनामीच्या भीतीने अनेक जण पोलिसांपर्यंत येतच नसल्याने या टोळ्यांचे फावत आहे.
चौकट
असे ओढले जाते जाळ्यात
फेसबुकवर ज्याचे ‘प्रोफाइल’ स्ट्रॉग, पोस्टमधून आपली संपत्तीचे प्रदर्शन करणारे तरुण वा तरुणी ‘टार्गेट’ असतात.
प्रत्यक्षात आहोत त्यापेक्षा काहीतरी जादा असल्याचे दाखवणारेही यात ओढले जातात. सुरुवातीला केवळ बोलणे, पोस्टला लाइक झाल्यानंतर नंबर मिळवून बोलणे पुढे वाढविले जाते व बदनामीलाही हेच कारण पुरेसे ठरते.
चौकट
शंका आल्यास तातडीने संपर्क साधा
* पोलिसांकडून वारंवार अशा ‘हनी ट्रॅप’मध्ये न अडकण्याचे आवाहन केले जाते. त्याचे पालन करावे.
* अनोळखी तरुणीकडून, फेक अकाउंटवरून आलेली विनंती स्वीकारू नये.
* तरीही कोणाला आपल्या मित्र यादीत समावेश असलेल्या व्यक्तीकडून संदेश येत असल्यास त्याच्याशी संपर्क ठेवू नये.
* असे प्रकार होत असल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क करावा. सायबर पोलीस ठाण्यात याची दखल घेतली जाते.
कोट
आमिषाला बळी पडू नका
समाजमाध्यमांवर ओळख नसलेल्या व्यक्तीकडून संवाद वाढवत त्याव्दारे फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे कोणीही आपल्या परिसरातील, ओळखीच्या नसलेल्या व्यक्तीला आपल्या मित्र यादीत समाविष्ट करू नये व आपली वैयक्तिक माहिती देऊ नये.
संजय क्षीरसागर, सहा. पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे, सांगली