जिल्ह्यात ७२०० रुग्णांना ‘१०८’ रुग्णवाहिकेचा लाभ
By Admin | Updated: March 16, 2015 00:10 IST2015-03-15T22:53:00+5:302015-03-16T00:10:30+5:30
या सेवेमुळे जिल्ह्यातील ७,२२८, तर राज्यातील २,०९,०४७ रुग्णांना या मोफत सेवेचा लाभ मिळाला

जिल्ह्यात ७२०० रुग्णांना ‘१०८’ रुग्णवाहिकेचा लाभ
संजय घोडे-पाटील - कोकरूड ग्रामीण भागातील सामान्य जनतेसाठी जीवनदायी ठरलेली महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना सुरू करून एक वर्ष पूर्ण झाले आहे. सांगली जिल्ह्यामध्ये २३, तर संपूर्ण राज्यामध्ये ९३७ रुग्णवाहिका काम करत आहेत. या सेवेमुळे जिल्ह्यातील ७,२२८, तर राज्यातील २,०९,०४७ रुग्णांना या मोफत सेवेचा लाभ मिळाला असून, १०८ हा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक या सेवेला दिला आहे. ही आपत्कालीन रुग्णसेवा ग्रामीण भागातील नागरिकांना, गरोदर महिला व अपघात किंवा दुर्घटना घडलेल्या ठिकाणी वरदान ठरते. या क्रमांकावर दूरध्वनी केल्यास रुग्णवाहिका घटनास्थळी काही मिनिटातच पोहोचते. त्यामुळे गोरगरीब जनतेला दिलासा मिळण्याबरोबर शासकीय रुग्णालयाकडे रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. या रुग्णवाहिकेमध्ये डॉक्टरांचे पथकही कार्यरत असल्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत.
शिराळा तालुक्यामध्ये शिराळा, कोकरुड, नाठवडे याठिकाणी रुग्णवाहिका कार्यरत असून, या सेवेसाठी ९ वैद्यकीय अधिकारी, सहा चालक असे १५ कर्मचारी काम करत असून, ही सेवा विनाविलंब २४ तास सुरू आहे.१०८ या क्रमांकावर विनाकारण ‘मिस कॉल’ दिला अथवा काहीही काम नसताना दूरध्वनी केला, तर कायदेशीर कारवाई केली जाते. नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीतच १०८ क्रमांकावर दूरध्वनी करावा. घटनास्थळ, पत्ता व्यवस्थित सांगावा, सायरनचा आवाज येताच रस्ता खुला करावा, तसेच अपघातस्थळी डॉक्टरांना मदत करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
‘लाईफ सेव्हिंग नेटवर्क’
रूग्णांसाठी जीवनदान ठरणाऱ्या योजनेस एक वर्ष पूर्ण
सांगली जिल्ह्यात ७२०० रुग्णांना अखंडित मोफत सेवा
१०८ या रुग्णवाहिकेतून २४ तास डॉक्टर व चालक सेवा
जिल्ह्यात २३ रुग्णवाहिकांमुळे ‘लाईफ सेव्हिंग नेटवर्क’