एसटीचे आंदोलन मागे

By Admin | Updated: December 19, 2015 00:54 IST2015-12-19T00:48:40+5:302015-12-19T00:54:35+5:30

प्रवाशांचे हाल : फेऱ्यांचे नियोजन कोलमडले

Behind the movement of ST | एसटीचे आंदोलन मागे

एसटीचे आंदोलन मागे

सांगली : राज्य परिवहन महामंडळ (एसटी) कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या मागणीसाठी कॉँग्रेसप्रणित इंटक संघटनेने पुकारलेले बेमुदत बंद आंदोलन शुक्रवारी मागे घेण्यात आले. नागपूर येथे सरकार व इंटकच्या पदाधिकाऱ्यांत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. मागण्यांबाबत सरकारने प्रतिसाद दिल्याचे समजताच येथील बसस्थानक आवारात धरणे आंदोलनास बसलेल्या इंटकच्या सदस्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.
दरम्यान, आंदोलनामुळे गुरुवारी पूर्ण दिवसभर विस्कळीत झालेल्या बसफेऱ्या शुक्रवारी दुपारी दोनपर्यंत कायम राहिल्याने प्रवाशांचे मात्र मोठे हाल झाले. दुपारनंतर वाहतूक सुरु झाली असली तरी, प्रवाशांच्या गर्दीमुळे बसफेऱ्यांचे नियोजन कोलमडले होते. एसटी कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ मिळावी, यासह इतर मागण्यांसाठी गुरुवारपासून इंटक संघटनेने राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरु केले. जिल्ह्यातून त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. सांगली आगारातून जवळपास ६० टक्के फेऱ्या रद्द झाल्याने आंदोलनास चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सर्वसामान्यांची लाईफलाईन म्हणून ओळख असलेल्या एसटीचा संप फार काळ राहणार नाही, असा कयास होता.
गुरुवारी रात्री आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता असल्याने शुक्रवारी सकाळपासून वाहतूक सुरळीत होईल, असा अंदाज होता. मात्र, बैठकीत निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले होते. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास आंदोलन मागे घेण्यात येत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी जाहीर करीत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी मिठाई वाटून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या आंदोलनामुळे जिल्ह्यातून सर्व आगारातून सुटणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले.
जवळपास दीड दिवस चाललेल्या या आंदोलनामुळे सांगली विभागातील तीन हजारहून अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्याने एसटीच्या उत्पन्नातही घट झाली. गुरुवारी २२३० फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या, तर शुक्रवारी ७१७ फेऱ्या रद्द करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबरोबरच ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनाचाही फटका एसटीला बसला. या दोन दिवसात पाच बसेस फोडण्यात आल्याने महामंडळाचे ३० लाखांचे नुकसान झाले. दुपारी आंदोलन मागे घेण्यात आले तरी, बहुतांश कर्मचारी ड्युटीवर हजर न झाल्याने फेऱ्यांचे नियोजन कोलमडले होते. (प्रतिनिधी)
४० लाखांचा तोटा : तीन हजार फेऱ्या रद्द
एसटी कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे गुरुवारी सांगली विभागातील २२३० फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे एसटीला २७ लाख ७५ हजाराचा तोटा झाला, तर शुक्रवारी ७१७ फेऱ्या रद्द झाल्या. दीड दिवसात २९४७ फेऱ्या रद्द झाल्याने अंदाजे ४० लाखाहून अधिक तोटा झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यात पाच बसेस फोडण्यात आल्याने ३० लाखांचा तोटा झाला.
मिरजेत इंटकचे सातजण अटकेत
मिरजेत एसटी कामगार संघटनेच्या दोन गटात धक्काबुक्की व एसटी वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलिसांनी इंटकचे अध्यक्ष संजय यादव, सचिव अशोक गंगणे, कार्याध्यक्ष योगेश कांबळे, तानाजी देवकुळे, नंदकुमार शिंदे, सुभाष शिंदे, नागराज कांबळे या सात जणांना जमावबंदी आदेशाचा भंग केल्याबद्दल शुक्रवारी अटक केली. गुरूवारी एसटी वाहतूक रोखण्याच्या प्रयत्नात बाचाबाची झाली होती.

Web Title: Behind the movement of ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.