आधारकार्डाअभावी भिकारी, निराधारांचे कोरोना लसीकरण खोळंबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:24 IST2021-03-08T04:24:52+5:302021-03-08T04:24:52+5:30

सांगली : कोरोनाचे लसीकरण सर्वसामान्यांसाठी खुले केल्यानंतर त्यातील तांत्रिक अडचणी पुढे येऊ लागल्या आहेत. विशेषत: ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही ...

Beggars without Aadhaar card, corona vaccination of destitute | आधारकार्डाअभावी भिकारी, निराधारांचे कोरोना लसीकरण खोळंबले

आधारकार्डाअभावी भिकारी, निराधारांचे कोरोना लसीकरण खोळंबले

सांगली : कोरोनाचे लसीकरण सर्वसामान्यांसाठी खुले केल्यानंतर त्यातील तांत्रिक अडचणी पुढे येऊ लागल्या आहेत. विशेषत: ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही अशांना लसीचा लाभ मिळणार की नाही ? हा मोठा गुंतागुंतीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

साठ वर्षांवरील सर्व नागरिक आणि ४५ ते ५९ वर्षांदरम्यानचे व्याधीग्रस्त लाभार्थी यांच्यासाठी ऑनलाईन नोंदणीद्वारे लसीकरण सुरू झाले आहे. त्यासाठी आधारकार्ड आवश्यक आहे. शहरातील निराधार व भिकाऱ्यांच्या लसीकरणात ओळखपत्राची अट मुख्य अडसर ठरली आहे. एका माहितीनुसार जिल्ह्यात भिकाऱ्यांची संख्या सुमारे ८०० आहे, त्यातील अपवाद वगळता कोणाकडेच आधारकार्ड नाही. यातील अनेकजण कोरोनाग्रस्त झाले होते. उपचारानंतर बरे झाले तरी सध्या लसीपासून वंचित राहत आहेत. सरकारने लसीकरणाचा आराखडा बनविताना वंचितांचा कोणताच विचार केला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना व लॉकडाऊन काळात अनेक सेवाभावी संस्था, कार्यकर्त्यांनी निराधारांना जगविले, कोरोना उपचार मिळवून दिले. त्यांच्या आधार कार्डासाठी मात्र कोणीही विचार केला नाही. आरोग्य विभागासाठीदेखील हा उत्तर नसलेला प्रश्न बनला आहे.

चौकट

आधार नाही, तर लसही नाही

- आधार नाही तर लसही नाही अशी थेट भूमिका प्रशासनाला घ्यावी लागत आहे. लसीकरणाच्या पोर्टलवर सचित्र ओळखपत्राची अट असल्याने प्रशासनाचे हात बांधले गेले आहेत.

- लसीकरण मोहीम पुढे सरकेल त्यानुसार वेगवेगळ्या अडचणी पुढे येत गेल्या, त्यामध्ये ओळखपत्राची अडचणही स्पष्ट झाली. आरोग्य विभागाने यासंदर्भात वरिष्ठ प्रशासनाकडे मार्गदर्शन मागितले आहे.

- व्याधीग्रस्त भिकाऱ्यांचे लसीकरण झाले नाही आणि भविष्यात ते कोरोनाबाधित झाले तर समाजात सुपर स्प्रेडर म्हणून वावरण्याची भीती आहे, त्यामुळे कोरोनाचे शंभर टक्के उच्चाटन होऊ शकणार नाही.

चौकट

मिरजेत मोठ्या संख्येने भिकारी

- जिल्ह्यात सर्वाधिक भिकारी मिरज शहरात आहेत. एका माहितीनुसार येथे चारशेहून अधिक भिकारी राहतात. विस्तारीत भागातील झोपडपट्ट्यात त्यांची वस्ती आहे.

- रेल्वे जंक्शन, धार्मिक स्थळे, कर्नाटक सीमेलगतचे शहर यामुळे भिकाऱ्यांची संख्या वाढती राहिली आहे. लॉकडाऊन काळात मात्र जणू ते गायबच झाले होते.

- सांगलीतही तीनशेहून अधिक भिकारी आहेत. त्याशिवाय इस्लामपूर, विटा, तासगाव, आटपाडी येथेही निराधार भिकारी दिसतात. गेल्यावर्षी २५९ भिकाऱ्यांना त्यांच्या गावाकडे नेऊन सोडले होते, पण आता संख्या पुन्हा वाढली आहे.

कोट

महापालिकेच्या सावली निवारा केंद्रात ५९ निराधार राहतात. या सर्वांनाच कोरोनाची बाधा झाली होती. त्यांचे लसीकरण आधार कार्डाअभावी खोळंबले आहे. तिघा-चौघांकडेच आधार कार्ड आहे, इतरांना स्वत:ची नावेदेखील माहिती नाहीत. ओळखपत्र नाही म्हणून त्यांना लस नाकारणे अन्यायकारक ठरेल. यासाठी मार्ग काढण्याची विनंती प्रशासनाकडे केली आहे.

- मुस्तफा मुजावर, व्यवस्थापक, सावली निवारा केंद्र, सांगली

पॉईंटर्स

महापालिका क्षेत्रातील भिकारी - सुमारे ८००

बेघर निवारा केंद्रात राहणाऱ्यांची संख्या - ५९

महिला १२, पुरुष ४७

Web Title: Beggars without Aadhaar card, corona vaccination of destitute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.