जागावाटप फॉर्म्युला ठरला!
By Admin | Updated: April 24, 2015 01:16 IST2015-04-24T01:15:44+5:302015-04-24T01:16:42+5:30
जिल्हा बँक निवडणूक : राष्ट्रवादी ९, काँग्रेस ८, भाजप ३, शिवसेना १, सर्वपक्षीय सहमतीची शक्यता

जागावाटप फॉर्म्युला ठरला!
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय एकमत होण्याची शक्यता बळावली आहे. राष्ट्रवादीला नऊ, काँग्रेसला आठ, भाजपला तीन आणि शिवसेनेला एक जागा देण्याचा ‘फॉर्म्युला’ जवळपास निश्चित मानला जात आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत मॅरेथॉन बैठका सुरू होत्या. भाजप पाच
जागांवर, तर काँग्रेस नऊ जागांसाठी अडल्यामुळे रात्री उशिरापर्यंत निर्णय होऊ शकला नाही.
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. गुरुवारी माजी मंत्री मदन पाटील, खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, पृथ्वीराज पाटील दिवसभर विश्रामबाग परिसरातील हॉटेलमध्ये ठाण मांडून होते.
मिरजेच्या महाबळ फार्म हाऊसवरून माजी मंत्री आमदार जयंत पाटील सूत्रे हलवत होते. भाजपने पाच जागांसाठी, तर काँग्रेसने नऊ जागांसाठी आग्रह धरला होता. चर्चेच्या फेऱ्या रात्री उशिरापर्यंत चालल्या. खासदार पाटील यांनी पाच जागांचा आग्रह धरल्यानंतर जयंत पाटील यांनी त्यांना चर्चेचे निमंत्रण दिले. मिरजेच्या फार्म हाऊसवर दीड तास याबाबत चर्चा झाली. त्यानंतर विश्रामबाग परिसरातील एका हॉटेलमध्ये सायंकाळी सात वाजता संजय पाटील, मोहनराव कदम आणि विलासराव शिंदे यांची बैठक झाली. काँग्रेसला मिळणाऱ्या जागांबाबत पक्षांतर्गत मतभेद दिसून आले. काही नेत्यांनी आठ जागांवर सहमती दर्शवावी, असे सुचविले. तर काहींनी नऊ जागा मिळाल्या नाहीत, तर स्वतंत्र पॅनेलची तयारी करण्याचे मत व्यक्त केले.
बहुतांश नेत्यांनी आठ जागांबाबत हिरवा कंदील दर्शविल्याचे समजते. काँग्रेसने शेवटपर्यंत भाजप किंवा शिवसेनेसाठी एकही जागा न देण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादीला भाजपच्या नेत्यांची मनधरणी करावी लागली. भाजपमुळेच रात्री उशिरापर्यंत निर्णय होऊ शकला नाही. शुक्रवारी सकाळपर्यंत जागा वाटपाचा ‘फॉर्म्युला’ ठरल्याप्रमाणे निश्चित होण्याची शक्यता नेत्यांनी वर्तविली आहे. (प्रतिनिधी)